

बंगळूर : अर्थ खात्याने कर्नाटक उत्पादन शुल्क नियम-2025 ची राजपत्रित अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये मद्यावरील शुल्कात सुधारणा आणि करात बदल करण्यात आले आहेत. राज्य सरकारने भारतीय मद्य आणि बिअरवरील अतिरिक्त उत्पादन शुल्क वाढवण्याची अंतिम अधिसूचना जारी केली. त्यानुसार मद्यात सरासरी 15 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. सुधारित दर गुरुवारपासून (15 मे) लागू होतील.
राज्यात स्वस्त दरात उपलब्ध असलेल्या ब्रँडी, व्हिस्की, जिन आणि रमच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. सुधारित दर प्रणालीनुसार 180 मिली बाटली आणि सॅशेच्या किमतीत जास्तीत जास्त 15 रुपयांनी वाढ होईल, असे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्याने सांगितले. प्रीमियम किंवा इतर बिअर ब्रँडच्या किमती उत्पादन खर्चानुसार प्रतिबाटली सरासरी 5 ते 15 रुपयांनी वाढतील, अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या सूत्रांनी दिली.