

बेळगाव ः गोव्याहून बेळगावला आणले जाणारे सुमारे दोन लाख रुपये किंमतीचे 468 लिटर मद्य बुधवारी (दि. 23) रात्री जप्त करण्यात आले. बेळगाव-वेंगुर्ला रोडवरील सुळग्याच्या पुढील बाजूस असलेल्या मधुरा ढाब्यापासून काही अंतरावर सीसीबीने ही कारवाई केली. याप्रकरणी तवेरा वाहन ताब्यात घेऊन दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोवा बनावटीचे मद्य भरुन वाहन येत असल्याची माहिती सीसीबीचे निरीक्षक नंदिश्वर कुंभार यांना मिळाली. त्यांनी सहकार्यांसह जाऊन सापळा रचला. रात्रीच्यावेळी बाचीकडून येणारे वाहन अडवून तपासणी केली असता यामध्ये मद्याच्या बाटल्या आढळून आल्या.
या प्रकरणी मंजुनाथ गिडीगेरी व युवराज नाईक (दोघेही रा. बेळगाव) यांना ताब्यात घेतले. मद्याच्या बॉक्सची मोजदाद केल्यानंतर विविध प्रकारचे 468 लिटर मद्य असल्याचे आढळून आले.
पोलिस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग, कायदा व सुव्यवस्था शाखेचे डीसीपी रोहन जगदीश, रहदारी व गुन्हे शाखेचे डीसीपी निरंजन अर्स यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक कुंभार, उपननिरीक्षक मंजुनाथ बजंत्री व त्यांच्या सहकार्यांनी ही कारवाई केली. या कारवाईत एस. सी. कोरे, आय. एस. पाटील, एस. बी. पाटील, एम. एस. पाटील, जगदीश हादिमनी व अन्य सहकार्यांनी सहभाग घेतला.
गोवा बनावटीचे मद्य बेकायदेशीररित्या विकणार्याला अटक करून त्याच्याकडून 12 लिटर मद्य जप्त केले. उद्यमबागमध्ये अबकारी खात्याने ही कारवाई केली. या प्रकरणी परमेश्वर नायक याच्यावर गुन्हा दाखल केला. अबकारी खात्याने खानापूर तालुक्यातील हुळंदमध्येही 69 लिटर गोवा बनावटीचे मद्य जप्त केले. हे मद्य दोघेजण दोन दुचाकींवरुन घेऊन जात होते. त्यांना अडवून तपासणी केली असता मद्य आढळून आले. दोघा संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.