

मुंबई : आदिती कदम
एचपीव्ही लसीकरण मोहिम राज्यभरात अक्षरशः रेंगाळल्याचे चित्र आहे. 8 लाख 64 हजार 414 मुलींचे लक्ष्य असताना 5 मेपर्यंत केवळ 43 हजार 932 मुलींनाच लस देण्यात आली आहे. असे असताना शासनाकडून प्रयत्नांचे चित्र रंगवले जात आहे.
दरम्यान, 141 सत्रांद्वारे एका दिवसात 5,645 लसीकरण करण्यात आले असले, तरी ही गती अपुरी आहे. मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर विभागात काही प्रमाणात हालचाल दिसत असली तरी राज्यातील अनेक जिल्ह्यांत मोहीम कासवगतीने सुरू आहे. लातूर, बीड, वर्धा यांसारख्या जिल्ह्यांतील कामगिरी अत्यंत कमी आहे.
लसीकरणासाठी उपसंचालक पदे रिक्त असल्याने मोहिमेच्या अंमलबजावणीत समन्वयाचा अभाव जाणवत आहे. जिल्हा व विभागीय पातळीवर जबाबदारी निश्चित करणारे अधिकारीच उपलब्ध नसल्याने निर्णयप्रक्रिया आणि अंमलबजावणी दोन्हीवर परिणाम होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. एकीकडे लसीकरणानंतर कोणतेही दुष्परिणाम नोंदवले गेले नसल्याने मोहीम सुरक्षित असल्याचे सांगितले जात असले, तरी नेतृत्वाच्या अभावामुळे मोहीम कोलमडल्याचे चित्र आहे.
नेतृत्वाचा अभाव; लसीकरण मोहिमेची गती कोलमडली
एचपीव्ही लसीकरण मोहिमेत जनजागृती, सत्रांचे नियोजन आणि नागरिकांपर्यंत पोहोचण्यात गंभीर त्रुटी असल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे, उपसंचालकांसारखी महत्त्वाची पदे रिक्त असल्याने नेतृत्वाचा अभाव जाणवत असून, याचा थेट परिणाम मोहिमेच्या गतीवर होत आहे. कागदोपत्री सत्रांची संख्या वाढवली जात असली तरी प्रत्यक्षात लसीकरणाचा प्रतिसाद मर्यादित राहिल्याचे चित्र आहे. जिल्हानिहाय कामगिरीत मोठी तफावत दिसून येत असून अनेक ठिकाणी मोहीम अपेक्षित वेगाने पुढे सरकत नाही.
मुंबई: 223 सत्रे; एकूण 957
पुणे विभाग: 85 सत्रे 1696
नाशिक विभाग: , 2831
नागपूर विभाग: 2810
औरंगाबाद विभाग: 1171