

मुंबई : गोपाळकाला उत्सवात मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदांसाठी राज्य सरकारने यंदाही विमा संरक्षणाचा निर्णय केला आहे. दहीहंडी उत्सवासाठी राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्याबाबतचा शासन निर्णय (जीआर) क्रीडा विभागाने जारी केला.
या निर्णयानुसार, दहीहंडीची वाढती लोकप्रियता आणि गोविंदांची वाढती संख्या लक्षात घेऊन २०२६ मध्ये विमा संरक्षणाचा लाभ घेणाऱ्या गोविंदांची संख्या मागील वर्षाच्या १ लाख ५० हजारांवरून १ लाख ६० हजार करण्यात आली आहे. या विमा संरक्षणांतर्गत अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व आल्यास १० लाख रुपयांपर्यंत विमा मिळणार आहे.
दोन अवयव किंवा दोन डोळे गमावल्यासही १० लाख रुपये, तर एक हात, एक पाय किंवा एक डोळा गमावल्यास ५ लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. कायमस्वरूपी अंशतः अपंगत्वासाठी विमा पॉलिसीत नमूद केलेल्या टक्केवारीनुसार भरपाई दिली जाणार आहे. अपघातामुळे झालेल्या रुग्णालयीन उपचारांचा प्रत्यक्ष खर्च किंवा जास्तीत जास्त १ लाख रुपयांपर्यंतचा खर्चही विम्याअंतर्गत समाविष्ट करण्यात आला आहे.
गोविंदांचा विमा उरविण्यासाठी क्रीडा व युवक सेवा आयुक्तांनी प्रति गोविंदा ७५ रुपये किंवा त्यापेक्षा कमी विमा हप्ता आकारणाऱ्या शासकीय विमा कंपनीची निवड करावी, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. विमा हप्त्याचा निधी राज्य क्रीडा विकास निधीतून उपलब्ध करून दिला जाणार आहे. दरम्यान, राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनने सराव व प्रशिक्षण घेतलेल्या, निर्धारित वयोमर्यादा पूर्ण करणाऱ्या आणि प्रत्यक्ष दहीहंडीमध्ये सहभागी होणाऱ्या गोविंदांची नोंदणी करून त्यांची माहिती तपासून प्रमाणित करणे आवश्यक आहे. ही माहिती क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडे सादर केल्यानंतर नोंदणीकृत गोविंदांच्या संख्येनुसार विमा हप्त्याची रक्कम अदा केली जाणार आहे.
आयोजकांवर सुरक्षेची जबाबदारी
न्यायालय, शासन, स्थानिक प्रशासन व पोलिसांकडून वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. गोविंदांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याची जबाबदारी आयोजकांवर राहणार आहे. अपघात झाल्यास गोविंदांना तत्काळ वैद्यकीय मदत * देण्याची जबाबदारी आयोजकांवर सोपवली आहे.