Monsoon Session 2026: पावसाळी अधिवेशनात १० विधेयकं मांडले जाणार, फडणवीसांची माहिती

राजकारण केले तर राजकीय उत्तर देऊ : मुख्यमंत्री फडणवीस
Monsoon Session 2026
Monsoon Session 2026Pudhari
Published on
Updated on

मुंबई: पावसाळी अधिवेशन पूर्णवेळ म्हणजे तीन आठवडे चालणार असून, या अधिवेशनात सरकारकडून एकूण १० महत्त्वाची विधेयके मांडली जातील. यामध्ये शेतात राबणाऱ्या, पण उपेक्षित राहिलेल्या महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देण्याचे अत्यंत क्रांतिकारी विधेयक सरकार घेऊन येत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ मंत्री उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, तीन आठवड्यांच्या पावसाळी अधिवेशनात संवादाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय करण्याचा, प्रश्नांच्या सोडवणुकीचा सरकारचा प्रयत्न आहे. अधिवेशनात आमचा प्रयत्न संवादाचाच असून, विरोधकांनी हिताची चर्चा केली तर हितकारक उत्तरे मिळतील; मात्र राजकारण केले तर राजकीय उत्तर दिले जाईल, असा इशारा त्‍यांनी दिला.

लोकांना अपेक्षित मुद्देच विरोधकांना अवगत नाहीत, त्यामुळे पत्र लिहिण्यासाठीही त्यांना चॅटजीपीटीचा वापर करावा लागत असल्याचा टोलाही त्‍यांनी लगावला. सरकारने जाहीर केलेली कर्जामाफी ही बँकांसाठी नसून शेतकर्‍यांच्या हितासाठी असल्याचे सांगत विरोधकांचे आरोप त्यांनी खोडून काढले. त्याचवेळी 'ऑपरेशन यशस्वी झाले असून बाॅडी सदृढ आहे', अशा शब्दांत ठाकरे गटाच्या खासदार फुटीवर मुख्यमंत्र्यांनी प्रथमच भाष्य केले.

Monsoon Session 2026
Maharashtra Assembly Session: सरकारला अधिवेशनात धारेवर धरणार; विरोधकांचा इशारा

विरोधकांनी चहापानावर टाकलेल्या बहिष्कारावर खोचक टोला लगावताना मुख्यमंत्री म्हणाले की, विरोधक चर्चेला आले असते तर निश्चित संवाद घडला असता. मात्र, त्यांनी येण्याऐवजी आधीच सह्या गोळा करून ६ पानांचे पत्र जोडले आहे. विरोधकांनी पाठवलेले हे पत्र पाहिले तर ते 'एआय' (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि 'चॅटजीपीटी'च्या मदतीने तयार केल्याचे स्पष्ट दिसते. म्हणजे पत्र लिहिण्यासाठीही आता विरोधकांकडे स्वतःचे विषय, कल्पकता किंवा प्रश्नांचे आकलन उरलेले नाही.

पण, एका गोष्टीचा आनंद आहे की ते तंत्रज्ञानाचा उपयोग करत आहेत, यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. त्यांच्या पत्रातील एक पॅराग्राफ तर २०२३ पासून तोच आहे, त्यावर कारवाई झाली तरी तोच मजकूर पुन्हा टाकला जातो. लोकांना अपेक्षित असलेले मुद्दे विरोधकांना माहीतच नाहीत.

जयंत पाटील पत्रकार परिषदेला वेळेवर पोहोचले, कारण आम्ही 'कनेक्टिंग लिंक' तयार केल्यामुळे ते ट्रॅफिकमध्ये अडकले नाहीत. विशेष म्हणजे विरोधकांचा 'अल-निनो'ला सुद्धा आमच्याशी जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे; हेसुद्धा त्यांनी चॅटजीपीटीला विचारले असते तर असे विधान केले नसते, अशी टोलेबाजी मुख्यमंत्र्यांनी केली.

कंत्राटदारांना टक्केवारीशिवाय बिले मिळत नसल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी खोडून काढला. कंत्राटदारांनी अशी काही तक्रार केल्यास कारवाई करू. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांचे भास अलीकडच्या काळात वाढले आहेत.

त्यांना वेगवेगळे भास व्हायला लागले आहेत, असा टोला फडणवीस यांनी लगावला. त्याचवेळी महायुतीचे सरकार इतके पारदर्शक आहे की मंत्रालयातही यावे लागत नाही. बिलांसाठीच्या व्यवस्था ऑनलाइन केल्या आहेत. त्यामुळे विरोधकांनी हवेत तीर मारणे, वाटेल ते आरोप करणे बंद करावे. अशाने जनतेचा विश्वास मिळत नाही. आम्हीही विरोधात होतो, आम्ही पुराव्यांसह आरोप केले आणि कधी आमच्यावर केलेला आरोप मागे घ्यायची वेळ आली नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सुनावले.

कर्जमाफी बँकांसाठी नाही, तर शेतकर्‍यांसाठी

राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही बँकांसाठी नाही, तर शेतकऱ्यांसाठी आहे. कोणतीही निवडणूक डोळ्यांसमोर नसताना आम्ही ही कर्जमाफी केली आहे. विधानसभा नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही आधीच जिंकलो आहोत. त्यामुळे २०२९ च्या निवडणुकीचा विचार करून आम्ही थांबलो नाही.

Monsoon Session 2026
Maharashtra Monsoon Session: विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन गाजणार! ऑपरेशन टायगरच्‍या पार्श्वभूमीवर आजपासून तीन आठवड्यांचे कामकाज

कर्जमाफी आमच्यासाठी राजकीय विषय नसून, शेतकरी जगला पाहिजे आणि त्याला पुन्हा उभे राहण्याची ताकद मिळाली पाहिजे हाच आमचा हेतू आहे. कोणत्याही कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण परिस्थितीनुसार मदत करावी लागते. यासाठी आम्ही स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीच्या अहवालानुसार काही निकष ठरवले आहेत. या कर्जमाफीमुळे राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा फायदा होणार आहे.

विरोधकांनी २००९ साली आणि २०२० मध्ये कर्जमाफी केली होती. तेव्हा त्यांनी सातबारा कोरा केल्याचा दावा केला. त्यांनी सातबारा कोरा केला होता तर आता कर्जमाफी का करावी लागते आहे, असा प्रश्न करतानाच यूपीए सरकारच्या काळातील कर्जमाफीपेक्षाही सुटसुटीत आणि सोपी कर्जमाफी महायुती सरकारने केली आहे. त्यामुळे अभ्यास न करता केवळ अटी-शर्ती आहेत, असा आरोप विरोधकांनी चालविला आहे. जेव्हा शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ सुरू होईल तेव्हा विरोधकांची तोंडे बंद होतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये!

राज्यातील पावसाच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन केले. एल-निनोमुळे यंदा पाऊस खूप लांबला आहे. जून महिन्यामध्ये सरासरीपेक्षा ८० टक्के कमी पाऊस पडला असून ही चिंतेची बाब आहे. कोकणात ८६ टक्के, विदर्भ ८०, मराठवाडा ६९, मध्य महाराष्ट्रात ८३ टक्के कमी पाऊस झाला आहे. काही जिल्ह्यांत पावसाचा एक थेंबही पडलेला नाही.

कोकणात २३ जूनपासून पावसाचा जोर वाढेल, मात्र विदर्भ आणि मराठवाड्यात कमी पाऊस राहण्याची शक्यता आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाची चिन्हे कमी असल्याने शेतकऱ्यांनी दुबार पेरणीची वेळ येऊ नये म्हणून पेरणीची घाई करू नये. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यासाठी योग्य पाऊस पडेपर्यंत पाणी उपसा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

ऑपरेशन अर्धवट करत नाही, फुलप्रूफ करतो : एकनाथ शिंदे

ऑपरेशन टायगरसंदर्भात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर लवकरच तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल. आम्ही कोणतेच ऑपरेशन अर्धवट करत नाही, फुलप्रूफ करतो. ते सर्वांना माहीत आहे आणि त्याचा अनुभवही आहे. सकाळी आरोप करायचे, शिवीगाळ करायची आणि संध्याकाळी गुपचूप घरी जाऊन पाय धरायचे, चर्चा करतात, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला लगावला.

संवादाने प्रश्न सुटतात : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

लोकशाही व्यवस्थेत विधिमंडळ हे जनतेच्या अपेक्षा, प्रश्न आणि आकांक्षा मांडण्याचं सर्वोच्च व्यासपीठ आहे. या अधिवेशनात जनहिताचे विषय, विकासकामे आणि राज्याच्या प्रगतीशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा होईल. चहापानाचा कार्यक्रम केवळ औपचारिकता नसून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील संवादाचे प्रभावी माध्यम आहे. मतभेद असू शकतात, पण लोकशाहीत संवाद अत्यंत महत्त्वाचा असतो.

जनतेच्या हितासाठी विधायक चर्चा आणि सकारात्मक सहकार्य आवश्यक आहे. विरोधकांनी चहापानावर बहिष्कार घातला, मात्र मी त्यावर भाष्य करु इच्छित नाही,.संवादाने प्रश्न सुटतात, यावर माझा विश्वास आहे, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या. जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करून मार्ग काढण्याची आमची भूमिका कायम राहील. राज्याच्या विकासासाठी, शेतकरी, कामगार, महिला, युवक, उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांशी संबंधित विषयांवर सरकार अधिवेशनात सकारात्मक भूमिका मांडेल, असेही त्यांनी सांगितले.

ऑपरेशन यशस्वी झाले असून बाॅडी सदृढ आहे : मुख्यमंत्री

ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून ठाकरे गटाच्या खासदार फुटीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी, 'ऑपरेशन यशस्वी झाले असून बाॅडी सदृढ आहे,' अशा शब्दांत प्रथमच भाष्य केले, तर पक्षप्रमुख पद सोडून लायक शिवसैनिकाकडे सोपविण्याच्या उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवरही फडणवीस यांनी टीका केली. उजाडलेल्या गावाची पाटीलकी सोडतो म्हणणे कितपत योग्य आहे. शिवसेना हा पक्ष नसून तो दिवंगत बाळासाहे ठाकरे यांचा विचार आहे.

तो संपत्तीचा वारसा नसून विचारांचा आहे. उद्धव ठाकरे यांनी जेव्हा विचारांचा वारसा सोडला त्याक्षणी विचारांचे पाईक असणारे वेगळे झाले. त्या सर्वांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात विचार पुढे नेण्यासाठी शिवसेना जिवंत ठेवली. विचार मानणारे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते हे सातत्याने शिंदे यांच्या नेतृत्वात एकत्र येत आहेत. जेव्हा आत्मचिंतन करण्याची वेळ होती तेव्हा उद्धव ठाकरेंनी ते केले नाही. बाळासाहेबांची शिवसेना, धनुष्यबाण आता शिंदेंकडे आहे. बाळसाहेबांचे विचार ते शिवसेनेच्या माध्यमातून पुढे नेत आहेत, अशी टोलेबाजी मुख्यमंत्र्यांनी केली.

विरोधकांनी पायर्‍यांवर स्टंट करणे थांबवावे : एकनाथ शिंदे

विरोधकांनी नेहमीप्रमाणे बिनबुडाचे आरोप केले असून जळजळ,मळमळ कमी करण्यासाठी विरोधकांनी योग करावा. अमेरिका आणि इराणनेही युद्धबंदी केली, पण विरोधकांचा बहिष्कार काही संपत नाही. त्यांना आमचा दिवसाचा चहा आवडत नाही. पण, लपूनछपून भेटत राहतात, त्यामुळे पेय बदलून बघा, असा एक सल्ला आल्याचा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.

सरकार जर कुठे चुकत असेल तर ते विरोधकांनी दाखवून द्यावे, पण बिनबुडाचे - चुकीचे, खोटे आरोप करत टीका करत राहण्याची भूमिका चुकीची असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील मविआचे सरकार बदलले नसते तर महाराष्ट्र २०-२५ वर्षे मागे गेला असता, असा दावा करतानाच आम्ही विकासाला प्राधान्य दिले, त्यामुळे लोक त्यांना का सोडून जात आहेत याचे विरोधकांनी आत्मपरीक्षण करावे.

आम्ही दिलेला शब्द पाळतो, प्रिंटिंग मिस्टेक म्हणून पळ काढत नाही. विरोधकांनी सभागृहात यावे, बोलावे, चर्चा करावी, प्रत्येक प्रश्नाला सरकार उत्तर देईल. विरोधकांनी केवळ पायऱ्यांवर स्टंट करण्याचे उद्योग बंद करावे. विरोधकांची संख्या कमी असली तरी त्यांना मान देणार. उगाच खोटेनाटे आरोप करू नये, असेही शिंदे यांनी सुनावले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news