

मुंबई ः शैक्षणिक संस्थांच्या परिसरात आढळणाऱ्या भटक्या कुत्र्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये नोडल अधिकारी म्हणून मुख्याध्यापक, तर सर्वेक्षणासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्याचे आदेश राज्यातील शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. यामुळे शिक्षक संघटनांनी आणि पालकांनी या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शिक्षण आयुक्तांनी काढलेल्या एका ताज्या परिपत्रकानुसार, प्रत्येक शाळेत आता एका शिक्षकाची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. या शिक्षकांवर शाळा परिसराची स्वच्छता राखण्यासोबतच शाळेत शिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांना रोखण्याची अजब जबाबदारी टाकण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांचे परिसर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले होते. त्यापाठोपाठ विद्यापीठ अनुदान आयोगाने उच्च शिक्षण संस्थांसाठी अशाच मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने याचा आधार घेत थेट शिक्षकांनाच कुत्रे हाकलण्याच्या कामाला जुंपले आहे. नव्या नियमानुसार, नियुक्त केलेल्या नोडल अधिकारी शिक्षकाचे नाव शाळेच्या प्रवेशद्वारावर लावणे बंधनकारक असून, भटक्या कुत्र्यांचा वावर शाळेत होणार नाही, याची सर्वस्वी जबाबदारी शिक्षकांची असेल.