Sangli stray dogs issue: मोकाट कुत्र्यांचा उच्छाद; संयमाचा बांध तुटण्याच्या मार्गावर

रोजचे जगणे असुरक्षित : सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देऊनही यंत्रणा ढिम्म : ‌‘डॉग शेल्टर‌’ प्रस्तावाचा फुटबॉल
Sangli stray dogs issue
Sangli stray dogs issuePudhari Photo
Published on
Updated on
उध्दव पाटील

सांगली : ‌ ‘माझा नातू गेटजवळ उभा होता. मी आतून स्कूटर काढून बाहेर येतोय, तोच भटक्या कुत्र्याने नातवावर हल्ला केला. त्याला खाली पाडून कुत्रा त्याचे लचके तोडत होता. त्याचा डोळ्याजवळ लचका तोडला आहे. कपाळाजवळही जखम झाली आहे. चार वर्षांचा मुलगा आहे; त्याला कुत्र्याने फाडले हो...!‌’, हे सांगताना आजोबांच्या डोळ्यात पाणी आलं. ते अत्यंत व्यथित आणि हादरलेल्या अवस्थेत घटनेची माहिती देत होते. त्यांच्या आवाजात भीती आणि असाहाय्यता दिसून येत होती. या कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अशी विनंती ते करत होते. या घटनेनं एक आजोबा नव्हे, तर एक संपूर्ण कुटुंब कोलमडलं. मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांचे रोजचे जगणे किती असुरक्षित झाले आहे, हे यातून ठळकपणे समोर येते.

सार्वजनिक ठिकाणांवरील भटकी कुत्री त्वरित हटवून, त्यांची नसबंदी करून त्यांना निवारागृहात हलवावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना दिले आहेत. पण उपाययोजनांबाबत सर्वत्र आनंदीआनंद दिसत आहे. या निर्देशांनाही शासन, प्रशासकीय यंत्रणा हलक्यात घेत असल्याचे दिसून येते.

मध्यंतरी संजयनगरमध्ये चार-पाच कुत्र्यांनी घरात घुसून एका महिलेवर हल्ला केला होता. शहरात रस्ते, चौक, शाळा परिसर, भाजी मंडई, क्रीडांगणे यांसह सार्वजनिक ठिकाणी जिकडे पाहावे तिकडे भटकी कुत्री दिसून येतात. बालके, शाळकरी मुले, मुली, महिला, वृद्धांवर या कुत्र्यांचे होणारे हल्ले, हे आता नेहमीचेच झाले आहे. रात्रीच्या वेळेस रस्ते, चौकात कुत्र्यांच्या झुंडी पाहूनच घाम फुटतो. एवढी दहशत भटक्या कुत्र्यांची आहे.

मोकाट कुत्र्यांचा प्रश्न आता केवळ संख्येपुरता मर्यादित राहिलेला नाही. रस्त्यावरील नागरिकांसाठी, शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी, दुचाकीस्वारांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी मोकाट कुत्री जीवघेणी ठरत आहेत. रात्रीच्या वेळी टोळक्याने रस्त्यांवर फिरणारी कुत्र्यांची झुंड दुचाकींचा पाठलाग करत असल्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. अचानक भुंकणे, मागे लागणे, तसेच चावण्याचा प्रयत्न यामुळे अनेक अपघात होत आहेत. अनेकांना किरकोळ नव्हे, तर गंभीर दुखापतींना सामोरे जावे लागत आहे.

घरातून बाहेर पडताना भीती वाटते. रात्री उशिरा घरी जातानाही भीती वाटते, अशी भावना आता नागरिक उघडपणे व्यक्त करत आहेत. विशेषतः लहान मुले आणि वृद्ध हे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याचे बळी ठरत आहेत. शाळेत जाणारी मुले रस्त्यावरून चालताना घाबरलेली दिसतात. तसेच सकाळी फिरायला निघालेल्या ज्येष्ठ नागरिकांना पुढे कुत्र्यांची झुंड पाहून रस्ता बदलावा लागतो. काही ठिकाणी तर नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी काठी घेऊन किंवा गटा-गटाने फिरायला जाण्याचा पर्याय स्वीकारला आहे. ही परिस्थिती एखाद्या शहरासाठी लाजिरवाणी म्हणावी लागेल.

बंदोबस्त नेमका कोण करणार?

प्रशासन, महापालिका, लोकप्रतिनिधी, यंत्रणा यांच्यातील जबाबदारीची ढकलाढकली आता नागरिकांच्या जिवावर बेतत आहे. निवेदने, तक्रारी, पाठपुरावा करूनही ठोस उपाय होत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. आज स्थिती अशी आहे की, नागरिकांना लहान मुलांना एकट्याने बाहेर सोडता येत नाही, वृद्धांना सकाळी फिरायला जाता येत नाही.

नसबंदी, लसीकरण झाल्यानंतर भटक्या कुत्र्यांना ज्या ठिकाणाहून पकडले होते, पुन्हा त्याच ठिकाणी सोडावे लागते. भारत सरकारच्या 10 मार्च 2023 च्या अधिसूचनेत तसे स्पष्टपणे नमूद आहे. त्यामुळे डॉग व्हॅनमधून पकडून नेलेली कुत्री नसबंदी शस्त्रक्रियेनंतर पुन्हा त्याच भागात दिसायची. त्यावरून नागरिक संताप व्यक्त करत होते. मात्र काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सार्वजनिक ठिकाणांच्या परिसरातून भटकी कुत्री उचलून निवारागृहात ठेवायची आहेत. मात्र निवारागृह तरी आहे कुठे? ते केव्हा बांधणार?

महापालिकेने शहरातील भटक्या कुत्र्यांसाठी एक आधुनिक डॉग शेल्टर उभारण्यासाठी 2.55 कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हा नियोजन समितीअंतर्गत नावीन्यपूर्ण योजनेतून सादर केला होता. डॉग शेल्टर हे प्राणी कल्याणाच्या राष्ट्रीय मानकांनुसार बांधले जाईल. निमल बर्थ कंट्रोल आणि निलम वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाच्या कठोर नियमांचे पालन करून ते बांधले जाईल, ज्यामुळे कुत्र्यांची सुरक्षितता, आरोग्य आणि नैसर्गिक वातावरणाची पूर्ण काळजी घेतली जाईल, तशी माहिती आयुक्त सत्यम गांधी यांनी दिलेली आहे. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन विभागाने हा प्रस्ताव महापालिकेकडे परत पाठवला आहे. हा प्रस्ताव नावीन्यपूर्ण योजनेऐवजी नगरोत्थान योजनेतून पाठवण्यास कळवले आहे. डॉग शेल्टरच्या प्रस्तावाचा असा ‌‘फुटबॉल‌’ झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news