Prakash Abitkar: वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांसाठी आरोग्यमंत्र्यांचा पुढाकार; समिती गठित

कामाचे तास, पदोन्नतीसाठी डीएसीपी योजनेचा होणार अभ्यास
Prakash Abitkar
Prakash AbitkarPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: राज्यातील राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विविध सेवाविषयक मागण्यांची दखल घेत सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पुढाकार घेतला आहे. या मागण्यांचा सविस्तर अभ्यास करून शासनाला शिफारशी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने विशेष समिती गठित केली आहे. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना, गट-अ (मॅग्मो) यांच्या मागण्यांबाबत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली १६ सप्टेंबर २०२६ रोजी बैठक झाली होती. या बैठकीत वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कामाचे तास, करिअरमधील प्रगती आणि कल्याण निधी यांसह विविध विषयांवर चर्चा झाली. या मागण्यांचा सकारात्मक विचार करून व्यवहार्य उपाययोजना सुचविण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Prakash Abitkar
NSEL Scam Investor Refund: १३ वर्षांनंतर एनएसईएल गुंतवणूकदारांना दिलासा; १,९५० कोटींचा परतावा मिळणार

या समितीकडून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामाचे तास निश्चित करण्याबाबत अभ्यास केला जाणार आहे. तसेच केंद्र सरकार आणि अन्य राज्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या डायनॅमिक ॲश्युअर्ड करिअर प्रोग्रेशन (डीएसीपी) योजनेचा अभ्यास करून महाराष्ट्रात तिची अंमलबजावणी करण्याबाबत शिफारशी केल्या जाणार आहेत.

याशिवाय गट-अ वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र कल्याण निधी योजना तयार करण्याच्या दृष्टीने तिची रचना, आर्थिक तरतूद, लाभांचे स्वरूप आणि अंमलबजावणीची पद्धत निश्चित करण्याबाबतही समिती अभ्यास करणार आहे.

Prakash Abitkar
Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळावरून 'सिटीफ्लो'ची मोफत बससेवा बंद; विमानातून उतरल्यानंतरच्या प्रवासाचे सर्व पर्याय आता पेड

आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. समितीमध्ये मंत्रालयातील अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, मॅग्मो संघटनेचे प्रतिनिधी आणि आरोग्य विभागातील संबंधित अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांवरील कामाचा ताण, सेवाविषयक अडचणी मार्गी लावण्यासाठी समितीच्या शिफारशी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.