

Maharashtra FDA
मुंबई: महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पारा आणि शिसे यांचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आढळलेल्या तीन सौंदर्यप्रसाधनांना निकृष्ट दर्जाचे घोषित केले आहे. या उत्पादनांचा वापर, खरेदी किंवा वितरण तात्काळ थांबवण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले असून; विक्रेते, वितरक आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मनाही त्यांची विक्री व साठा त्वरित बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
FDA ने जारी केलेल्या इशाऱ्यानुसार, 'Goree Beauty Cream', 'Face Fresh Gold (Beauty Cream + Beauty Serum)' आणि 'Golden Star Beauty Cream' या तीन उत्पादनांमध्ये आरोग्यास घातक ठरू शकणाऱ्या पारा आणि शिसे या विषारी धातूंचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आढळले आहे. त्यामुळे ही उत्पादने निकृष्ट दर्जाची असल्याचे घोषित करण्यात आले आहे.
तपासणीदरम्यान या उत्पादनांच्या पॅकेजिंगवर उत्पादकाचे नाव व पत्ता, बॅच क्रमांक, उत्पादनाची तारीख आणि कालबाह्यता तारीख (Expiry Date) यांसारखी आवश्यक माहितीही नमूद नसल्याचे FDA च्या निदर्शनास आले. त्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर, सर्व किरकोळ विक्रेते, घाऊक विक्रेते, वितरक आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मना संबंधित उत्पादनांची विक्री आणि साठा तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच उपलब्ध साठा आणि बाजारातून परत मागवण्यात आलेल्या उत्पादनांचा तपशील तातडीने संबंधित FDA कार्यालयात सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
दरम्यान, नागरिकांनी सौंदर्यप्रसाधने खरेदी करताना केवळ अधिकृत विक्रेत्यांकडूनच पूर्ण माहिती असलेली उत्पादने खरेदी करावीत; तसेच उत्पादनावरील उत्पादकाची माहिती, बॅच क्रमांक, उत्पादन व कालबाह्यता तारीख यांची खातरजमा करूनच त्यांचा वापर करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.
जनतेच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या बेकायदेशीर औषध व्यवसायाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जून महिन्यात राज्यभर विशेष मोहीम राबवत ३४ ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत ४.१२ कोटी किमतीची बेकायदेशीर औषधे, सौंदर्यप्रसाधने व वैद्यकीय साहित्यावर नियामक कारवाई करण्यात आली. तसेच ९ गुन्हे दाखल करून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
निकृष्ट ठरलेल्या उत्पादनांमध्ये सनस्क्रीन लोशन, कुमकुम, आयुर्वेदिक औषधे, पॅरासिटामॉल, अँटिबायोटिक्स, अॅस्पिरिन, कफ सिरप, शॅम्पू, मेकअप फिक्सर स्प्रे आदी विविध उत्पादनांचा समावेश आहे.