Expired Food Products Virar : विरारमध्ये एफडीएच्या धडक कारवायांची धास्ती?

मुदतबाह्य बटर, बुरशी लागलेले नूडल्स रस्त्यावर फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
FDA Raid Vasai Virar
FDA Raid Vasai Virarpudhari photo
Published on
Updated on

विरार : अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) वसई-विरार परिसरात सुरू असलेल्या धडक तपासणी आणि कारवायांमुळे व्यापारी, हॉटेल व्यावसायिक आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असताना विरार पश्चिमेतील आगाशी रोड परिसरात एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कारवाईच्या भीतीने मोठ्या प्रमाणात मुदतबाह्य बटरची पाकिटे, बुरशी लागलेले नूडल्स आणि इतर खराब झालेल्या खाद्यपदार्थांचा साठा रस्त्यालगत फेकून दिल्याचे समोर आले असून या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. रस्त्याच्या कडेला आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांचे बॉक्स, बटरची पाकिटे, नूडल्सचे पॅकेट्स तसेच इतर खाद्यसाहित्य विखुरलेल्या अवस्थेत आढळून आले. यापैकी अनेक वस्तूंची मुदत डिसेंबर २०२५ मध्येच संपलेली असल्याचे दिसून आले. काही पॅकेट्समध्ये बुरशी निर्माण झालेली असल्याने हा साठा कित्येक महिन्यांपासून पडून असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

FDA Raid Vasai Virar
Virar news | FDA च्या धडक कारवाईची धास्ती! विरारमध्ये मुदतबाह्य बटर, बुरशी लागलेले नूडल्स रस्त्यावर फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

विशेष म्हणजे, अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेसंदर्भातील नियम अत्यंत कठोर असतानाही अशा प्रकारचा निकृष्ट आणि मुदतबाह्य साठा इतक्या मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने अन्नसुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. हे पदार्थ जर ग्राहकांपर्यंत पोहोचले असते तर नागरिकांच्या आरोग्याशी मोठा खेळ झाला असता, अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनाने वसई-विरार परिसरातील अनेक हॉटेल्स, खाद्यपदार्थ विक्री केंद्रे, गोदामे आणि किराणा दुकाने यांच्यावर अचानक धाडी टाकून तपासणी सुरू केली आहे. अनेक ठिकाणी संशयित खाद्यपदार्थांचे नमुने जप्त करण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यामुळे काही व्यापाऱ्यांनी संभाव्य कारवाई टाळण्यासाठी आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने हा मुदतबाह्य साठा रस्त्यावर टाकून दिल्याची शक्यता स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

या घटनेमुळे केवळ मानवी आरोग्यालाच नव्हे तर पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. रस्त्यावर टाकण्यात आलेले हे पदार्थ भटकी जनावरे, कुत्रे, पक्षी आणि इतर प्राणी खात असल्याचे नागरिकांनी सांगितले. अशा खराब झालेल्या पदार्थांचे सेवन केल्यास त्यांना विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा कचरा नाल्यांमध्ये वाहून गेल्यास प्रदूषण वाढण्याची आणि दुर्गंधी निर्माण होण्याची शक्यता आहे.

FDA Raid Vasai Virar
Pune Illegal Liquor Crackdown: पुण्यात हातभट्टी दारूचा विळखा; 19 मृत्यूनंतर कारवाईला वेग

स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागांचे लक्ष वेधत तातडीने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. फेकून दिलेल्या खाद्यपदार्थांचे नमुने जप्त करून त्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात यावी, हा साठा नेमका कोणत्या दुकानातून किंवा गोदामातून आला याचा शोध घेण्यात यावा आणि दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अन्नपदार्थांशी संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर केवळ दंडात्मक नव्हे तर कठोर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे. लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना पाठीशी घालण्याऐवजी त्यांच्यावर गुन्हे दाखल करून अशा प्रकारांना कायमचा आळा घालणे गरजेचे असल्याचे मतही व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, विरारमध्ये उघडकीस आलेल्या या प्रकारामुळे अन्नसुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याची गरज असल्याचे मत विविध स्तरांतून व्यक्त होत आहे. आता अन्न व औषध प्रशासन, वसई-विरार महानगरपालिका आणि संबंधित यंत्रणा या प्रकरणात कोणती कारवाई करतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

रस्त्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात खराब खाद्यसाठा टाकण्यात आल्याचे पाहून आम्हाला धक्का बसला. हा साठा कुणाचा आहे याचा शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.

संतोष शिंदे, स्थानिक नागरिक

मुदतबाह्य किंवा बुरशी लागलेल्या खाद्यपदार्थांचे सेवन केल्यास अन्नविषबाधा, पोटाचे विकार, उलट्या, जुलाब तसेच गंभीर संसर्ग होण्याची शक्यता असते. अशा पदार्थांची विक्री किंवा साठवणूक हा अत्यंत गंभीर प्रकार असून याबाबत कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.

डॉ. अमोल पाटील, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news