

नवी मुंबई: नवरात्रोत्सवा फुलांना मोठी मागणी असताना बाजारात फुलांची आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे. विशेषतः झेंडूच्या फुलांचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचे चित्र आहे. घाऊक बाजारात झेंडूचा दर सुमारे ४० रुपये किलो असून, किरकोळ बाजारात तो ६० ते ७० रुपये इतका आहे.
मुंबईतील फुलांच्या बाजारात नाशिक, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि जुन्नर या भागांतून मोठ्या प्रमाणात फुलांची आवक होत आहे. यंदा फुलांचे उत्पादन व बाजारातील आवक वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा कमी दरावर समाधान मानावे लागत आहे.
बाजारात पांढऱ्या शेवंतीला १६० ते २०० रुपये किलो, तर पिवळ्या शेवंतीला १२० ते १५० रुपये किलो दर मिळत आहे. गुलाबाच्या फुलांचा एक बंडल ६० ते ८० रुपयांना, तर किलोचा दर ८० ते १०० रुपये आहे.
यंदा पाऊस नसल्यामुळे विविध भागांतून फुलांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. आवक वाढल्याने झेंडूचे दर घसरले आहेत.
- राहुल खांडगे, फुल व्यापारी