

मुंबई: आयुर्वेदिक औषधांच्या उत्पादनात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या राज्यातील १० उत्पादक संस्थांचे उत्पादन परवाने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कायमस्वरूपी रद्द केले आहेत. राज्यातील ४३४ आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांची व्यापक तपासणी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये नियमांचे पालन न करणाऱ्या १३५ संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांकडून औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० तसेच नियम, १९४५ आणि शेड्यूल टी अंतर्गत असलेल्या चांगल्या उत्पादन पद्धतींच्या (जीएमपी) पालनाची तपासणी करण्यात आली.
यामध्ये कारखाना परिसराची स्थिती, मंजूर तांत्रिक मनुष्यबळ, गुणवत्ता नियंत्रण विभाग, बॅच उत्पादन अभिलेख, कच्चा व तयार मालाच्या चाचणी नोंदी, प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी), वितरण अभिलेख, तक्रार नोंदवही, कॅलिब्रेशन आणि स्टॅबिलिटी डेटा आदींची छाननी करण्यात आली.
तपासणीमध्ये गंभीर त्रुटी आढळलेल्या १० संस्थांमध्ये मान्यताप्राप्त तांत्रिक व्यक्तींची अनुपस्थिती, त्यांच्या अनुपस्थितीत उत्पादन, गुणवत्ता नियंत्रण विभाग कार्यरत नसणे, आवश्यक यंत्रसामग्री व उपकरणांचा अभाव, अस्वच्छ उत्पादन परिसर, बॅच उत्पादन व कच्च्या मालाच्या नोंदींमध्ये तफावत, लेबलवर चुकीचा उत्पादन दिनांक नमूद करणे, कच्च्या व तयार मालाची चाचणी न करणे यांसारख्या गंभीर बाबी आढळल्या.
याशिवाय मंजूर नकाशानुसार उत्पादन परिसर नसणे, कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणी व प्रशिक्षणाच्या नोंदी नसणे, कंट्रोल सॅम्पल आणि मास्टर फॉर्म्युला रेकॉर्डचा अभाव तसेच औषधांमध्ये क्रॉस-कंटॅमिनेशन टाळण्यासाठी आवश्यक कार्यपद्धती नसल्याचेही निदर्शनास आले.
औषधांची गुणवत्ता, सुरक्षितता व परिणामकारकता तसेच सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने या त्रुटी अत्यंत गंभीर असल्याने परवाना प्राधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. आयुर्वेदिक औषध उत्पादकांनी शेड्यूल टीमधील जीएमपीच्या तरतुदींचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा एफडीएने दिला आहे.
‘आयुर्वेदिक औषधांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. ग्रंथोक्त औषधांचे उत्पादन मान्यताप्राप्त संदर्भ ग्रंथातील तरतुदींनुसार, तर पेटंट अँड प्रोप्रायटरी औषधांचे उत्पादन व गुणनियंत्रण निर्धारित निकषांनुसार करणे बंधनकारक आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या उत्पादकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल,’ असे एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.
या संस्थांवर कारवाई
कृष्णा हर्बल (बारामती), लालशाह ऑरगॅनिक प्रॉडक्ट्स (करंजा, गोंदिया), आदित्य फार्मा (वडेगाव, तिरोडा), अंगरस आयुर्वेद (वडेगाव, तिरोडा), कालिदास गांधी (पुणे), शिवनाथ आयुर्वेदिक प्रोडक्ट्स कंपनी (सिन्नर), इंडुकेअर फार्मा प्रा. लि. (जेजुरी एमआयडीसी), हकीम आयुर्वेदिक ब्युटी केअर (अमरावती), हिलॅरियस आयुर्वेद (मुंडीपार एमआयडीसी, गोंदिया) आणि यशोदा लॅब प्रा. लि. (नाशिक रोड) या १० संस्थांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.