

Maharashtra Cabinet Decision
मुंबई: राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज (दि. ७) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. "राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी पुन्हा आपल्या पायावर उभा राहिला पाहिजे, यासाठी सरकारकडून जास्तीत जास्त मदत दिली जाईल," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.
कोरडवाहू शेतीसाठी - १८ हजार ५०० रुपये (प्रति हेक्टर)
हंगामी बागायतीसाठी - २७ हजार रुपये (प्रति हेक्टर)
बागायतीसाठी - ३२ हजार ५०० रुपये (प्रति हेक्टर)
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे आपल्या पिकांवर पोटच्या मुलांप्रमाणे प्रेम असते. अनेक ठिकाणी जमीन खरडून गेली आहे. त्यामुळे रब्बीची पेरणी करण्याची शक्यताही संपली. अशा परिस्थितीत शंभर टक्के नुकसान भरपाई कोणीच देऊ शकत नाही. मात्र भविष्यात शेती आणि शेतकरी उभा राहिला पाहिजे, यासाठी आम्ही जास्तीत जास्त मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये २५३ तालुक्यांत मोठे नुकसान झाले आहे. त्या ठिकाणी सरसकट मदत करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
आम्ही सर्व प्रकारच्या नुकसानीसाठी मदत करत आहोत. नव्याने घरे बांधण्यासाठी मदत करणार आहोत. दुभती जनावरे, ओढकाम करणारी जनावरे यांनाही मदत दिली जाईल. कुक्कुट पालन केलेल्या शेतकऱ्यांना १०० रुपये प्रति कोंबडी याप्रमाणे मदत दिली जाईल. खरडून गेलेल्या जमिनीबाबत मोठी मदत करावी लागणार आहे. ४७ हजार रुपये हेक्टरी रोख आणि ३ लाख रुपये नरेगाच्या माध्यमातून दिले जातीील. विहिरींमधील गाळ काढण्यासाठी ३० हजार प्रति विहीर मदत दिली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
पिकांच्या बाबतीत ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे पॅकेज राज्य सरकारकडून दिले जाईल. यातील जास्तीत जास्त पैसा हा दिवाळीपूर्वी देण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. पीक नुकसानीसाठी जवळपास १८ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत करत आहोत. ज्या गोष्टी नियमात बसत नाहीत तिथे सीएसआरच्या माध्यमातून मदत केली जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.