

मुंबई: महाराष्ट्र शासनातर्फे दहीहंडी उत्सवाला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच आपल्या गोविंदांना स्पेनलाही पाठवणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी रविवारी दिली.
महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनने परळ येथील राष्ट्रीय मजदूर मिल संघात आयोजित केलेल्या कृष्णानंद सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन अध्यक्ष बाळा पडेलकर, कार्याध्यक्ष सुरेंद्र पांचाळ, सचिव गीता झगडे, अभिषेक सुर्वे यांच्यासह दहीहंडी पथके, गोविंदा तसेच दहीहंडी उत्सवासाठी कार्यरत विविध संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
गोविंदा पथकांसाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत न्यायालयीन लढाई लढावी लागली. ती सरकारच्या ठाम भूमिकेमुळे जिंकता आली, असे शेलार म्हणाले. महाराष्ट्रात काही संघटना आणि लोक सातत्याने मराठी आणि हिंदू सणांवर मर्यादा आणण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसतात.
कधी गणेशमूर्तींच्या विसर्जनावर बंदी आणा, गणेशमूर्ती कशा बनवायच्या यावर मर्यादा आणा, पारंपरिक गणेश मंडळांना परवानग्या मिळता कामा नये, गणेशोत्सवात आरतीसह ध्वनी परवानग्यांवर मर्यादा आणा, नागपंचमीसारख्या सणांत खेळावर आणि पूजनावर मर्यादा आणा, गोविंदा दहीकाला उत्सवात उंची, थर, वय आणि आयोजनावर मर्यादा आणा असल्या मागण्या करत असतात, असा आरोप शेलार यांनी केला.
मराठी सणाला विरोध करणारे शहरी नक्षलवादाशी जोडली आहेत का?
मराठी मातीतल्या, मराठी माणसाचे, हिंदूंच्या सणांना रोखण्याचीच भूमिका या अशा लोकांची सातत्याने दिसते आहे. नागरी प्रश्नांची काळजी जरूर घेऊ, पण बंदीचा निर्णय मान्य नाही. अशा मर्यादा आणि बंदी आणण्यापर्यंत भूमिका मांडणारी हे लोकं शहरी नक्षलवादाशी जोडली आहेत का, असा आपला थेट आरोप आहे. त्यामुळेच मराठी, महाराष्ट्रातल्या आणि हिंदू सणांची बाजू सर्व चिंता काळजींसह आम्ही घेऊ, असे शेलार यांनी यावेळी सांगितले.