Maharashtra Congress | काँग्रेसमध्ये सपकाळांना पक्षश्रेष्ठींचे बळ, प्रसादांसमोर महाराष्ट्राची संघटनात्मक कसोटी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाबाबत नाराजी, राज्यातील काही काँग्रेस नेते दिल्लीत येत असल्याच्या चर्चा
Harshwardhan Sapkal Congress
Harshwardhan Sapkal CongressPudhari
Published on
Updated on

Harshwardhan Sapkal Congress

प्रशांत वाघाये

नवी दिल्ली : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाबाबत नाराजी व्यक्त करण्यासाठी राज्यातील काही काँग्रेस नेते दिल्लीत येत असल्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होत्या. या चर्चांपैकी काही बाबींना तथ्यात्मक आधार असल्याचे काँग्रेसमधील सूत्रांचे म्हणणे होते.

मात्र, महाराष्ट्रात नुकतेच पार पडलेले ‘छात्रो की गुंज’ आणि नाशिक येथे सर्व जिल्हाध्यक्षांसाठी आयोजित दहा दिवसीय प्रशिक्षण शिबिर यशस्वी झाल्याने सपकाळ यांच्या नेतृत्वाला काही प्रमाणात बळ मिळाल्याचे चित्र आहे. या दोन्ही उपक्रमांच्या यशात अनेक नेते आणि कार्यकर्त्यांचे योगदान असले, तरी प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांचे नेतृत्व सपकाळ यांच्याकडे होते. त्यामुळे या उपक्रमांचे राजकीय श्रेय त्यांच्या नेतृत्वाला मिळणे स्वाभाविक मानले जात आहे.

Harshwardhan Sapkal Congress
Amit Patkar Goa Congress | 'मला बैठकीचे निमंत्रणच नव्हते!' गोवा काँग्रेसमधील अंतर्गत वादावर माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा नवीन नाही. मात्र, दोन महत्त्वाचे उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात सपकाळ यांना यश आले आहे. राजकारणात एखाद्या उपक्रमाचे यश, अपयश हे सामूहिक प्रयत्नांचे फलित असते. परंतु त्याची अंतिम जबाबदारी नेतृत्वाची असते. त्यामुळे या यशामुळे सपकाळ यांच्यावरील पक्षश्रेष्ठींचा विश्वास वाढल्याचे समजते. याचे बक्षिस म्हणजे सपकाळ यांना संघटनेत काम करायला पूर्ण मोकळीक आहे. त्यामुळे पुढील काळात राज्यभर पक्षाचे संघटन मजबूत करणे, जिल्हा आणि तालुका पातळीवर कार्यकर्त्यांची फळी उभी करणे, निष्क्रिय कार्यकर्त्यांना सक्रिय करणे आणि आगामी निवडणुकांसाठी पक्षाची तयारी करणे, ही प्रमुख आव्हाने सपकाळ यांच्यासमोर असतील.

केंद्र आणि राज्य सरकारविरोधातील काँग्रेसची भूमिका अधिक प्रभावीपणे मांडण्याची जबाबदारीही त्यांना पार पाडावी लागणार आहे. सपकाळ यांना पक्षश्रेष्ठींचा विश्वास आणि अधिक स्वायत्तपणे काम करण्याची संधी मिळाली असले तरी ही संधी त्यांच्यासाठी मोठी जबाबदारीही ठरणार आहे. आगामी काळातील संघटनात्मक कामगिरीचा हिशोब त्यांना पक्षश्रेष्ठींना द्यावा लागेल. त्यामुळे मिळालेल्या राजकीय श्रेयाचे रूपांतर प्रत्यक्ष संघटनवाढीत करणे, हे त्यांच्यासमोरील खरे आव्हान असेल.

Harshwardhan Sapkal Congress
Congress Party | खांदेपालटाचे आव्हान

नव्या प्रभारींसमोर संघटन विस्ताराचे आव्हान

दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी म्हणून डॉ. सिरिवेला प्रसाद यांची नियुक्ती झाली आहे. सुरुवातीला प्रसाद यांच्या नियुक्तीबाबत महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात उत्सुकता आणि काहीसे कुतूहल होते. त्यांची नियुक्ती राहुल गांधी यांच्या पसंतीने झाल्याचे समजते. सिरिवेला प्रसाद यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमध्ये विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. दलित चळवळींशीही त्यांचा दीर्घकाळ संबंध राहिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्यांचा अनुभव आणि संघटनात्मक कामाची पद्धत लक्षात घेऊन महाराष्ट्राची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे समजते.

यामुळे आगामी काळात प्रसाद-सपकाळ ही जोडी महाराष्ट्र काँग्रेसच्या संघटनात्मक वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावू शकते. मात्र, या दोघांसमोर आव्हानेही कमी नाहीत. एखाद्या राज्यातील राजकीय समीकरणे, स्थानिक गटबाजी आणि वरिष्ठ नेत्यांमधील संबंध समजून घेण्यासाठी नव्या प्रभारींना काही काळ लागतो. महाराष्ट्रातील परिस्थिती प्रसाद किती वेगाने आणि अचूकपणे समजून घेतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

Harshwardhan Sapkal Congress
Harish Rawat Quits Congress: परीक्षा घोटाळ्याचे भूत आता काँग्रेस नेत्यांच्या मानगुटीवर... माजी मुख्यमंत्र्यांनी पक्षालाच ठोकला राम राम

प्रभारी आणि राज्यातील वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेद निर्माण होऊन त्याची झळ दिल्लीपर्यंत पोहोचू नये, याची काळजी घेणेही प्रसाद यांच्यासमोरील महत्त्वाचे आव्हान असेल. काही वर्षांपूर्वी मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी होते. त्यांना राज्याच्या राजकारणाची चांगली जाण होती आणि भाषेची अडचणही नव्हती. त्यानंतर रमेश चेन्निथला यांनीही राज्यातील संघटनात्मक समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. आता सिरिवेला प्रसाद हे हर्षवर्धन सपकाळ यांच्या सहकार्याने महाराष्ट्र काँग्रेसचे संघटन किती प्रभावीपणे मजबूत करतात, तसेच पक्षातील अंतर्गत मतभेदांवर समन्वयातून कसा मार्ग काढतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news