

Electricity Bill
मुंबई : येत्या १ जुलैपासून राज्यात विजेचे दर १० टक्क्यांनी कमी होतील. त्यानंतर पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने २६ टक्क्यांपर्यंत विजेचे दर स्वस्त होतील. इतिहासात पहिल्यांदाच दरवर्षी विजेचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. २६) पत्रकारांशी बोलताना सांगितले.
गेली २० वर्षे दरवर्षी विजेचे दर ९ ते १० टक्के वाढले आहेत. तेच दर आपण कमी करत आहोत. औद्योगिक वीज वापराचा दर हा १० रुपये ८८ पैसे आहे. पाच वर्षांत हा दर ९ रुपये ९७ पैशांपर्यंत खाली येईल. हा दरवाढीचा कल पाहिला असता तो १५ रुपयांवर गेला असता, पण आता हा दर कमी होईल. व्यवसायिक वीज दर १६ रुपये ९७ पैसे असून तो २३ रुपये ९१ पैसे झाला असता; पण आता तो १५ रुपये ८७ पैशांपर्यंत खाली येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
व्यापारी वीज वापर दरही कमी होणार आहे. घरगुती वीज वापराचे ग्राहक ७० टक्के आहेत. हा दरवाढ २६ टक्के होणार होती. पण आता घरगुती वापराच्या विजेचा दर पहिल्या वर्षी १० टक्क्यांनी कमी होईल. तो ८.१४ रुपयांवरून ११ रुपये ३२ पैसे ऐवजी आता तो ६ रुपयांवर येईल, असेही फडणवीस म्हणाले.
'आम्ही वीजदर कमी करु, असे जाहीरनाम्यातून सांगितले होते. त्याप्रमाणे वीज दर कमी केले आहेत. आम्ही मोठी सूट देण्यात यशस्वी झालो आहोत. उद्योग, व्यापार, घरगुती करिता पहिल्यांदा ही सूट दिलेली आहे,'' असे फडणवीस यांनी सांगितले.
ज्यांची घरी स्मार्ट मीटर आहे अशा घरगुती ग्राहकांना दिवसा वीज वापरासाठी दहा टक्के अतिरिक्त टीओडी सवलत दिली जाणार आहे. तर सौर ऊर्जा निर्मिती करणार्या घरगुती ग्राहकांना प्रोत्साहन मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.