

मुंबई : राजन शेलार
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपासाठी चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्या, तरी प्रत्यक्षात उमेदवारी देताना राजकीय पक्षांना बंडखोरीची धास्ती लागून राहिली आहे. भाजप, शिंदे सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव सेना, मनसे आदी सर्वच पक्षांमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असताना, तिकीट न मिळाल्यास बंडखोर उमेदवार उभे राहण्याची शक्यता वाढल्याने पक्ष नेतृत्वाने उमेदवारी जाहीर करताना विशेष सावधगिरी बाळगण्याचा निर्णय घेतला आहे. बंडखोरीच्या भीतीमुळेच राजकीय पक्षांची उमेदवारीची घोषणा लांबणीवर पडली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, अर्ज भरण्यास अजून चार दिवस शिल्लक आहेत; मात्र अजूनही भाजप-शिंदे सेना यांच्यात जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. दुसरीकडे उद्धव सेना व मनसेने आपली युती जाहीर केली असली, तरी त्यांच्यात जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे.
काँग्रेसने स्वबळाचा निर्णय घेतला असला, तरी मुंबईत वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा प्रयोग सुरू आहे. तर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस कोणासोबत आघाडी करायची, या विचारात आहे. महाविकास आघाडी म्हणून अजूनही त्यांचा उद्धव सेनेबरोबर जाण्याचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने त्यांच्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत जागावाटपाची चर्चा सुरूच आहे.
अखेरच्या क्षणी उमेदवारांना एबी देणार?
बंडखोरीच्या धास्तीने अनेक प्रभागांमध्ये उमेदवारांची नावे जाहीर करण्यास उशीर होत असून, नाराज नेत्यांची मनधरणी करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत. काही पक्षांनी संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी इच्छुक उमेदवारांशी थेट संवाद साधला जात असला, तरीही अंतर्गत अस्वस्थता पूर्णपणे आटोक्यात येईल का, याबाबत राजकीय वर्तुळात साशंकता व्यक्त होत आहे. त्यामुळे सर्वच पक्ष बंडखोरी थोपविण्यासाठी अखेरच्या क्षणी उमेदवारांना एबी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शेवटच्या क्षणी याद्या जाहीर होणार?
बंडखोरांना अपक्ष अर्ज भरण्यास किंवा दुसऱ्या पक्षात जाण्यास पुरेसा वेळ मिळू नये, यासाठी सर्वच राजकीय पक्ष एक ते दोन दिवस आधीच अधिकृत नावे जाहीर करण्याची शक्यता आहे. तोपर्यंत केवळ ‘संकेत’ देऊन इच्छुकांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या जातील. तर दुसरीकडे निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षांतून आलेल्या ‘आयात’ उमेदवारांना झुकते माप मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यात किती जण बंडखोरी करतात, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
बंडखोरी टाळण्यासाठी ‘वेट अँड वॉच’
सर्वच प्रमुख पक्षांनी अद्याप आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. महापालिका निवडणुकीत विचारसरणीपेक्षा व्यक्ती, प्रभागातील पकड आणि स्थानिक प्रश्न अधिक महत्त्वाचे ठरतात. त्यामुळेच उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरीचे प्रमाण इतर निवडणुकांच्या तुलनेत अधिक असते. यंदाच्या निवडणुकीत हीच भीती सर्वच राजकीय पक्षांना भेडसावत आहे. इच्छुक उमेदवारांची संख्या वाढली असून, प्रत्येक प्रभागात ‘आपलीच उमेदवारी योग्य’ असा दावा करणारे नेते सक्रिय झाले आहेत. त्यामुळे ‘बंडखोरी’ टाळण्यासाठी सर्वच पक्षांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली असून, ऐनवेळी पत्ते खोलण्याची रणनीती आखली जात आहे.