

मुंबई : पवन होन्याळकर
राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रियेत यंदा धक्कादायक वास्तव समोर आले असून, राज्यातील तब्बल 1,118 कनिष्ठ व उच्च माध्यमिक महाविद्यालयांमध्ये एकाही विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला नाही. एकीकडे महाविद्यालये विद्यार्थ्यांविना ओस पडलेली असताना, दुसरीकडे दरवर्षी नव्या तुकड्या व महाविद्यालयांना दिल्या जाणाऱ्या परवानग्यांमुळे वाढत्या जागांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तब्बल दहा फेऱ्या होऊनही राज्यभरात 8 लाख 21 हजार 846 जागा रिकाम्या राहिल्या आहेत.
यंदा अकरावी प्रवेश प्रथमच एकाच वेळी सुरू करण्यात आले व 14 लाख 85 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. मात्र, या विद्यार्थ्यांच्या तुलनेत जागांची संख्या तब्बल 7 लाखांनी अधिक असल्याने, मोठ्या प्रमाणावर जागा रिकाम्या राहणार हे आधीच स्पष्ट झाले होते. दहावीच्या निकालानंतर एकाच वेळी सुरू झालेल्या प्रवेश प्रक्रियेमुळे पॉलिटेक्निक-आयटीआय प्रवेशात गतवर्षीपेक्षा वाढ झाली; मात्र अकरावीवरील परिणाम मर्यादित राहिला.
कमी प्रवेशाची दोन कारणे
1. गरजेपेक्षा अधिक महाविद्यालये, तुकड्या, अभ्यासक्रमांना परवानग्या. 1,118 कॉलेजातील मान्यता, तुकड्या, नियुक्त्या व अनुदानाचा विचार केला, तर निधीच्या वापराबाबतही प्रश्न उभे राहतात.
2. दुसरीकडे, 2,083 कॉलेजांत सर्व जागा भरल्या जाणे हा विद्यार्थ्यांचा कल निवडक, शहरकेंद्री, सुविधा-संपन्न व नावाजलेल्या कॉलेजांकडेच अधिक आहे. यामुळे ग्रामीण, दुर्गम, कमी सुविधा असलेल्या कॉलेजांकडे विद्यार्थी वळत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
महाविद्यालयांची संख्या : 9,548
एकूण जागा ः 21,69,657
नोंदणी केलेले विद्यार्थी : 14,85,686
झालेले प्रवेश ः 13,47,811
रिक्त जागा ः 8, 21, 846
अकरावीला बोर्डनिहाय प्रवेशित विद्यार्थी
एसएससी : 12,44,434
सीबीएसई : 72,068
सीआयएससीई/आयसीएसई : 18,759
इंटरनॅशनल बॅकलॉरिएट : 54
आयजीसीएसई : 2,199
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग : 1,186
इतर बोर्ड : 9,111
एकूण प्रवेश : 13,47,811