

मुंबई: बेकायदेशीर रॅपिडो बाईक टॅक्सी सेवांना विरोध, विविध मागण्यांसाठी रिक्षाचालक-मालक संघटनांनी रविवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला होता. संप सोमवारी सायंकाळी पाचवाजेपर्यंत सुरू होता.
संपाला इतर जिल्ह्यांमध्ये प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. मात्र, या संपामध्ये मुंबई उपनगरांमधील रिक्षाचालकांनी सहभाग घेतला नव्हता. त्यामुळे उपनगरामध्ये दहा ते १५ टक्के रिक्षा बंद होत्या.
संपामुळे बाहेरून येणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. मुंबई उपनगरात सुमारे दोन लाख रिक्षा आहेत. प्रवासी वाहतुकीसाठी नियमांचे पालन न करणाऱ्या बाईक टॅक्सी सेवांवर कारवाई करावी, कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी करावी, मीटर भाडेदराचा प्रश्न, ऑनलाइन कंपन्यांच्या मनमानीला आळा घालावा, सुरक्षित रिक्षा स्टँड उपलब्ध करून द्यावे अशा मागण्या रिक्षाचालकांच्या आहेत.
दरम्यान, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये रिक्षाचालकांनी १००टक्के रिक्षा बंद होत्या, असा दावा महाराष्ट्र रिक्षाचालक सेना (ठाकरे गट) कोल्हापूर जिल्हाप्रमुख राजेंद्र जाधव यांनी केला.
याबाबत स्वाभिमान टॅक्सी अँड रिक्षा युनियन मुंबई अध्यक्ष के.के.तिवारी यांनी सांगितले की, मुंबई उपनगरातील रिक्षाचालकांच्या मागण्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवारी निवेदन देण्यात येणार आहे.