

मुंबईतील पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती, मिसिंग लिंकमधील दरड कोसळल्याची घटना या मुद्द्यांवरुन सरकारला घेरणाऱ्या विरोधकांचा एकनाथ शिंदेंनी शुक्रवारी समाचार घेतला.
Eknath Shinde Vidhan Parishad Speech on Uddhav Thackeray
मुंबई : आम्ही फेसबुकवाले नाहीत फेस टू फेस वाले आहोत. एका बाजूला बाप्पा मोरया बोलायचं आणि डिनो मोरियाला काम द्यायचं, अशा खोचक शब्दात एकनाथ शिंदेंनी पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ठाकरेंना चिमटा काढला. मुंबईतील पाऊस आणि शहरातील परिस्थिती यावरुन टीका करणाऱ्या ठाकरे गटाला त्यांनी शिंदेशैलीत सुनावले.
शुक्रवारी विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सविस्तर उत्तर दिले. 'पावसामुळे होणारे नुकसान कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यापूर्वी मलमपट्टी व्हायची, आता कायमस्वरुपी काम झाले पाहिजे.जोरदार वाऱ्यांमुळे झाडे पडली. पायाभूत प्रकल्पांना वेग देताना राज्याच्या महसूल वाढवत आहोत. आमचे करप्शन नाही, नॅशन फस्ट आहे. जे केलं ते समोर आहे. मिसिंग लिंकची परिस्थिती बघितली पाहिजे. मात्र, या प्रकल्पामुळे मुंबई- पुणे अंतर 40 मिनिटांनी कमी झाले. हा गेमचेंजर प्रकल्प आहे. इल्जाम लगाने से पहले आईना देखा होता, सच की रोशनी में अपना चेहरा भी नजर आया होता' अशा शब्दांत शिदेंनी विरोधकांना सुनावले.
बाळासाहेबांना सोडून फाईव्ह स्टारमध्ये कोण गेले होते?
शिंदेंनी भाषणाच्या सुरूवातीपासून उद्धव ठाकरेंवर तिखट शब्दात टीका केली. शिंदे म्हणाले, महाराष्ट्रात एकूण अतिवृष्टीने बाधित 3318 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. सरकारच्या मदतकार्याची माहिती देतानाच शिंदेंनी 2005 च्या अतिवृष्टीचा दाखला दिला. ‘मिलिंद नार्वेकर तुम्ही साक्षीदार आहात या घटनेचे. 26 जुलै 2005 रोजीचे दृष्य आठवा. बाळासाहेबांना एकटे सोडून फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कोण गेले होते? , अशी आठवण शिंदेंनी करुन दिली.
अंदर की बात है
शेतकऱ्यांवर संकट येतं त्यावेळेला सरकार त्यांच्या मागे उभे राहते. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय घेतला, बच्चू कडू इथे उपस्थित आहेत, त्यांनी मुंबईत मोर्चाही आणला होता, असा शिदेंनी सांगताच काही आमदारांनी बच्चू कडूंमुळेच कर्जमाफीचा निर्णय झाला, त्याला कडूंचं नाव दिलं पाहिजे होते, असे सांगितले. त्यावर उत्तर देताना शिंदे म्हणाले, ये अंदर की बात है. मी, मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजित पवार यांनी आम्ही तिघांनी एका ठिकाणी चर्चा केली आणि समितीबाबत निर्णय घेतला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात कर्जमाफीचा निर्णय घेतला, असे शिंदेंनी सांगितले.
शरद पवारांना भेटलो तर किती मळमळ, जळजळ
एकनाथ शिंदेंनी विधान परिषदेतील भाषणात शरद पवारांच्या भेटीवरुन संजय राऊतांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. ‘ज्येष्ठ नेते शरद पवार माझ्या दालनात होते, ते ज्येष्ठ नेते असल्याने मी भेटायला गेलो. आपल्या संस्कृतीनुसार शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले. तर किती ती जळजळ, मळमळ. काही लोक देवेंद्रजींना जाऊन भेटतात, पुष्पगुच्छ देतात. पण यावर आम्ही कधीच काही बोललो नाही. देवेंद्रजीही मला कधी विचारणार नाही. आमचा एकमेकांवर विश्वास आहे, असं त्यांनी ठणकावले.
हम वो नही....
देवेंद्रजी आणि आमच्यात तुम्ही कितीही काड्या घालायचा प्रयत्न केला तरी काही होणार नाही. सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणणे, हाच आमचा अजेंडा आहे, असे सांगताना शिंदेंनी खास हिंदीतील शायरी सांगितले. हम वो नही जो दिल तोड देंगे, थाम कर हात फिर साथ छोड देंगे, पानी की तरह ये दोस्ती हमारी, कोई कितना भी चाहे हम जुदा नही होंगे, असे शिंदेंनी सांगितले.
...तर म्हणाले असते लायटरने लंका जाळली
उद्धव ठाकरेंनी अयोध्येतील भ्रष्टाचारावरुन केलेल्या महाआरतीवरुनही शिंदेंनी टीका केली. ‘सत्ता आली दाम, सत्ता गेली की राम', असा हा प्रकार आहे. कर्माची मिळाली शिक्षा. काही लोकांनी शोध लावलाय की हनुमानाने मशालीने लंका जाळली. त्यांच्या पक्षाची निशाणी जर लायटर असती तर म्हणाले असते लायटरने लंका जाळली, असे शिंदेंनी सांगताच सभागृहात हशा पिकला.