

Eknath Shinde visit Thane Municipal Corporation
ठाणे, पुढारी वृत्तसेवा : वृक्षप्राधिकरण विभागाकडून वेळेत झाडांच्या फांद्यांची छाटणी न झाल्याने पावसाच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली. याची गंभीर दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. त्यांनी आज (दि. ८) ठाणे महापालिकेच्या आपत्ती कक्षाला भेट दिली. झाडांच्या फांद्यांची छाटणी कधी केली, याचा जाब विचारत त्यांनी झाडांचे ऑडिट करण्याबरोबरच फांद्यांच्या छाटणीचा अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्याचसोबत वृक्षप्राधिकरण विभागात योग्य पद्धतीने काम करत नसणार्या अधिकार्यांची बदली करा, तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागात जबाबदारीने काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे आठ दिवसांसाठी निलंबन करण्याचे आदेशही त्यांनी पालिका आयुक्तांना दिले आहेत. शहरात तब्बल साडेतीन हजार फांद्यांची छाटणी शिल्लक असल्याचे वृत्त दै. 'पुढारी'ने प्रसिद्ध केले होते.
एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ठाणे महापालिकेच्या आपत्ती कक्षाला भेट दिली. यामध्ये त्यांनी ठाण्यातील आपत्तीचा पालिका अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, महापालिका आयुक्त सौरभ राव उपस्थित होते. यावर्षी शहरात कमी पाणी साचले असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. शहरात ठिकठिकाणी ८४ वॉटर पंप लावलेले आहेत; आवश्यकता आहे त्या ठिकाणी पंप लावल्यामुळे वॉटर लॉगिंगचे प्रमाण कमी असल्याचे त्यांनी सांगितले.
झाडे पडण्याचे प्रमाण यावर्षी वाढलेले आहे. जी झाडे पडलेली आहेत त्यांचे ट्रिमिंग कधी केले, याचा जाब त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना विचारला. शहरातील झाडांचे ऑडिट करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. झाडांची झालेली पडझड लक्षात घेता, भविष्यात झाडे कशी वाचवली जातील यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने काही झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे प्रशासनाने अलर्ट राहण्याची आवश्यकता आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडे पडल्यामुळे झाडांच्या फांद्या कधी छाटल्या याचा अहवाल सादर करा; ज्या अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम केले नाही त्यांचे आठ दिवसांसाठी निलंबन करण्याचे आदेश यावेळी दिले.
"अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. जे चांगले काम करतील त्यांचा सन्मान केला जाईल, तर जे हलगर्जीपणा करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल," असा इशारा देखील उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिला. "शून्य जीवितहानी आणि शून्य मृत्यू याची काळजी घ्या," असे आवाहन त्यांनी यावेळी केले. "पाऊस, वादळ, वारा पाहून सुरक्षितपणे वारी झाली पाहिजे," अशी सूचना करत वारकऱ्यांनी या सर्व गोष्टींची काळजी घेऊन सुरक्षितपणे वारी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी पालिकेचे अधिकारी आहेच; मात्र भविष्यात पाऊस आणि इतर आपत्तीचा सामना करण्यासाठी जर पालिकेचे मनुष्यबळ कमी पडत असेल, तर मनुष्यबळाचे आऊटसोर्सिंग करा, अशा सूचना त्यांनी यावेळी पालिका आयुक्तांना दिल्या.
"जे अधिकारी चांगले काम करतील त्यांचा सन्मान केला जाईल, मात्र जे अधिकारी कामात हलगर्जीपणा करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल," असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या कामांचे मूल्यमापन करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.
"पाऊस, वादळ, वारा पाहून सुरक्षितपणे वारी झाली पाहिजे," अशी सूचना करत वारकऱ्यांनी देखील या सर्व गोष्टींची काळजी घेऊन सुरक्षितपणे वारी करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. मोबाईल टॉयलेट, पाण्याची व्यवस्था आणि इतर सुविधांसाठी सरकारच्या वतीने नगर विकास विभागाकडून दहा कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.