

Maharashtra Assembly Monsoon Session 2025
मुंबई : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज गुरुवारी (दि.२ जुलै) चौथा दिवस आहे. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांची आज पुन्हा विधानसभेत आक्रमक भूमिका पाहायला मिळाली. त्यांनी विधानसभेतील इंग्रजी कामकाज पत्रिकेवर जोरदार आक्षेप घेतला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला तरी कामकाज पत्रिका इंग्रजीमध्ये का? असा सवाल त्यांनी केला.
''मी कधीही इंग्रजीमधून कार्यक्रम पत्रिका पाहिली नाही. इकडे मराठी अभिजात करायची आणि मराठी ज्यांना बोलता येत नाही त्यांना हिंदीची संधी असताना जबरदस्तीने इंग्रजी...! मग त्यांनी हिंदीत बोलावं. कार्यक्रम पत्रिकाच हिंदीत घ्यावी. हिंदीचा सक्तीचा विरोध करायचा आणि इंग्रजीच्या सक्तीवर प्रेम दाखवायचे. इंग्रजीला अलिंगन द्यायचे. यासाठी नियम समितीची बैठक घ्यावी. इंग्रजीत शब्द जिथे जिथे असतील तर काढून टाका. मराठी शिकलीच पाहिजे. समजा एखाद्याला अडचण असेल तर हिंदी. त्यांना खूपच इंग्रजीशिवाय समजत नसेल तर डायरेक्ट व्हिसा, पासपोर्ट काढून ब्रिटन पार्लमेंटमध्ये पाठवा,'' असे मुनगंटीवार सभागृहात म्हणाले.
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी, सभागृहाचे कामकाज इंग्रजी, मराठी या दोन्ही भाषेत चालत असल्याचे सांगितले. त्याव्यतिरिक्त ९ सदस्यांची अशी विनंती आलेली आहे की इंग्रजीमध्ये कामकाज पत्रिका देण्यात यावी, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहात चाकरमान्यांची व्यथा मांडली. कोकण रेल्वे नेमकी कुणासाठी आहे? असा सवाल कर त्यांनी, गावी जाताना आधी तिकीट काढूनदेखील ते कन्फर्म होत नसल्याचे सांगितले. दोन-तीन मिनिटांत तिकीट बुकिंग संपून जाते. दादर- रत्नागिरी रेल्वे बंद का करण्यात आली? मध्य रेल्वेने कोकणातील जनतेची चेष्टा केली आहे. कोकण रेल्वेचा फायदा दक्षिणेकडील राज्यांना अधिक होतो. कोकणासाठी नवीन गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.