

मुंबई: सोन्याचे ब्रेसलेट खरेदी करण्याचा बहाणा करुन सुमारे दीड कोटींचे सोन्याचे ब्रेसलेट घेऊन दोघांनी पलायन केल्याची घटना गिरगाव परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी मोहीत राघवेंद्र वर्मा आणि रमेश शांतीलाल ऊर्फ शंकरा राम या दोन्ही आरोपीविरुद्ध व्ही. पी. रोड पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्यांचा शोध सुरु केला आहे.
यातील तक्रारदार ज्वेलर्स व्यापारी असून ते फोर्ट परिसरात राहतात. त्यांचे काळबादेवी येथे एक शॉप आहे. एक महिन्यांपूर्वी त्यांची मोहीत शर्माशी ओळख झाली होती. त्यांच्याकडून त्याने तेरा लाख रुपयांची सोनसाखळी घेतली होती. १६ डिसेंबरला त्याने त्यांना कॉल करुन इंदौरमधील एक व्यापारी त्यांच्याकडे येणार असून त्यांना काही सोन्याचे दागिने खरेदी करायचे असल्याचे सांगितले. ठरल्याप्रमाणे दुसऱ्यांदा मोहीत त्यांच्या शॉपमध्ये आला होता. त्याने त्यांच्याकडे एक कोटी ऐंशी लाख रुपयांचे दिड किलो सोन्याच्या ब्रेसलेटची ऑर्डर दिली होती. त्यासाठी त्याने त्यांच्याकडे तीस लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून जमा केले होते.
ही मोठी ऑर्डर असल्याने त्यांनी त्यांचे नोकर रामसिंग राठोड आणि राजेश जैन यांना मोहितने दिलेल्या पत्त्यावर डिलीव्हरीसाठी पाठविले होते. तिथे मोहितचा नोकर रमेश शांतीलालसह अन्य एक तरुण होता. ते दोघे सोन्याचे ब्रेसलेट आतमध्ये बसलेल्या व्यापाऱ्याला दाखविण्यासाठी घेऊन गेले. मात्र परत आलेच नाही. त्यांनी मोहितला कॉल केल्यानंतर त्याने त्यांना गिरगाव येथे बोलाविले. तिथे गेल्यानंतर त्याने त्यांना पेमेंट करण्याचे आश्वासन देत पोलिसांत तक्रार करु नका, असा सल्ला दिला. त्यानंतर तो तेथून पळून गेला. तक्रारदारांनी व्ही. पी. रोड पोलिसांत तक्रार केली होती.