Municipal corporation elections : आडव्या उभ्या युती-आघाड्यांमुळे सर्वपक्षीय कार्यकर्ते संभ्रमात
मुंबई ः नरेश कदम
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत प्रमुख पक्षांनी आपल्या विचारधारा बासनात गुंडाळून ज्या पद्धतीने उभ्या-आडव्या युती अन् आघाड्या करणे सुरू केले आहे, ते पाहून सर्वपक्षीय कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. कोणता झेंडा घेऊ हाती, अशी प्रश्नांकित अवस्था या कार्यकर्त्यांची झाली आहे.
मुंबईत उद्धव आणि राज ठाकरे बंधू एकत्र आले, तसे पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये पवार काका-पुतणे यांनी हातात हात मिळविले आहेत.मुंबईत मनसे सोबत नकोच, असे म्हणणारी आणि त्यासाठी महाविकास आघाडी फोडणारी काँग्रेस नाशिक, पनवेल आणि पुण्यात मात्र उद्धव ठाकरे गट आणि मनसेसोबत जाण्याच्या तयारीत आहे.
सांगलीत शरद पवार-अजित पवार हे काका-पुतणे एकमेकांच्या विरोधात आहेत. त्यांच्या पक्षमालकीचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच निवडणूक आयोगाने घड्याळ पुतण्याला देत काकांच्या हाती तुतारी ठेवली. ही तुतारी बाजूला ठेवून हे काका-पुतणे पुण्यात मात्र एकाच-घड्याळ चिन्हावर पुण्याची लढाई लढण्याच्या तयारीत आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यात वर्षभर नवी मुंबईवरून संघर्ष सुरू आहे.आता शेवटच्या निर्णायक क्षणी मात्र भाजपश्रेष्ठींच्या आदेशाने दोघांनीही तलवारी म्यान केल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यातला कल्याण-डोंबिवली आणि ठाणे महापालिकांमधील संघर्षावरही अखेरच्या टप्प्यात पडदा पडला आहे. यामुळे गेले काही महिने ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीत लढणारे भाजप आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत.
मनसेच्या स्थापनेपासून गेली 20 वर्षे शिवसेना विरुद्ध मनसे असा कडवा संघर्ष सुरू होता. पण ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे गुन्हे अंगावर घेणारे दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते धुमसत आहेत. त्यातच अनेकांनी निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. पण आपल्या पक्षाकडे जागा नसल्याने त्यांची कुचंबणा होत आहे. काही इच्छुकांना आपल्याला तिकीट मिळणार नाही, याचा अंदाज आला आणि ते आता भाजप आणि शिंदे गटाच्या संपर्कात आहेत.
उद्धव ठाकरे गट आणि मनसेच्या ज्या इच्छुकांना तिकीट मिळणार नाही, अशा मराठीबहुल भागातील इच्छुकांच्या भाजपचे नेते संपर्कात आहेत. यात या आयारामांची वर्णी लागली तर भाजपसाठी झटत आलेले कार्यकर्ते वाऱ्यावर सोडले जाणार या भीतीने तेही संभ्रमात आहेत.
वसई-विरार महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र आहेत, पण तेथे हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडी, ठाकरे बंधू, काँग्रेस, शरद पवार गट अशी एकत्र आघाडी होत आहे.
सर्वच पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक नेत्यांना युती आणि आघाडी करण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे स्थानिक नेत्यांनी तेथील राजकीय परिस्थिती बघून आपले अहवाल नेतृत्वाला दिले आहेत. त्यामुळे राजकीय विचारधारेपेक्षा पक्षांचे अस्तित्व टिकविण्याची सर्वच पक्षांची धडपड सुरू आहे. या आयत्या वेळी झालेल्या युती आणि आघाड्यांमुळे कार्यकर्ते चक्रावून गेले आहेत.

