

मुंबई: महानगर गॅस कंपनीच्या नावाचा गैरवापर करून ग्राहकांना गॅस रीडिंग भरण्याच्या बहाण्याने बनावट ‘एपीके’ फाईल पाठवून मोबाईल हॅक करणाऱ्या टोळीचा कांदिवली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी उर्विशकुमार राजेशभाई पटेल, जनिकुमार प्रदीपभाई पटेल आणि अंकितकुमार संजयभाई पटेल या तिघांना गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील ओलपाड येथून अटक केली. आरोपींकडून फसवणुकीची ६ लाख २४ हजार ५१८ रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली.
कांदिवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ मे २०२६ रोजी सायंकाळी चारच्या सुमारास फिर्यादी बकुल कांतिलाल देसाई यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला. त्यांच्या गॅस रीडिंगचे काम बाकी असल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर आरोपींनी त्यांच्या मोबाईलवर महानगर गॅस कंपनीच्या नावाने एक ‘एपीके’ फाईल पाठवली.
ही फाईल डाउनलोड करण्यास सांगून आरोपींनी ग्राहकाचा मोबाईल हॅक केला. मोबाईलचा ताबा मिळवल्यानंतर आरोपींनी फिर्यादींच्या एचडीएफसी बँक खात्यातून २ लाख ७ हजार ४०१ रुपये ऑनलाइन पद्धतीने काढून घेतल्याचा आरोप आहे.
याच पद्धतीने ७ मे २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास शैलेश जयकिशन परमार यांना महानगर गॅसचे रीडिंग भरण्यासाठी १२ रुपये शुल्क भरायचे असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवरही महानगर गॅस कंपनीच्या नावाने ‘एपीके’ फाईल पाठवण्यात आली.
ती डाउनलोड करण्यास सांगून मोबाईल हॅक करण्यात आला. मोबाईल हॅक केल्यानंतर आरोपींनी परमार यांच्या एचडीएफसी बँकेच्या बचत खात्यातून ४ लाख १७ हजार ११७ रुपये काढून घेतल्याचे पोलिस तपासात समोर आले. या प्रकरणीही कांदिवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दोन्ही गुन्ह्यांचा तांत्रिक तपास करताना पोलिसांना आरोपींचा माग काढण्यात यश आले. तपासात आरोपींनी बजाज फायनान्सकडून कर्ज घेतल्याचे समोर आले. त्यानंतर मिळालेल्या पैशांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला. आरोपींनी फिर्यादींच्या खात्यातून ऑनलाइन पद्धतीने पैसे काढल्यानंतर त्या पैशांतून बजाज फायनान्सकडील सोन्याच्या तारण कर्जाची परतफेड केली. त्यानंतर तारण ठेवलेले सोन्याचे दागिने पुन्हा स्वतःकडे घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलिस सहआयुक्त मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त संदीप घुगे आणि सहायक पोलीस आयुक्त संतोष धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक करण सोनवणे यांच्या देखरेखीखाली कांदिवली पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.