Mahaparinirvan Diwas Today Mumbai traffic changes
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे. देशभरातून आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी दादरच्या चैत्यभूमी येथे पोहोचत आहेत. यानिमित्ते वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
वाहतुकीतील बदल: महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आले असून पुढील दोन दिवस, म्हणजे 7 डिसेंबरपर्यंत, वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. खालील रस्ते सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत:
• सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते हिंदुजा हॉस्पिटल रस्ता.
• रानडे रोड.
• ज्ञानेश्वर मंदिर रोड आणि जांभेकर महाराज रोड.
• केळुस्कर रोड दक्षिण आणि केळुस्कर रोड उत्तर हे दोन्ही रस्ते.
• एमबी राऊत मार्ग आणि टीएच कटारिया मार्ग.
• एलजे रोडवरील शोभा हॉटेल जंक्शन ते आसावरी जंक्शन हा परिसर.
या सोहळ्यासाठी राज्यपाल, राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर नेते मंडळी चैत्यभूमी परिसरात उपस्थित असतील. हे नेते चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतील आणि त्यानंतर मंचावरून अनुयायांशी संवाद साधतील. यावेळी राज्यपालांकडून आणि मुख्यमंत्र्यांकडून अभिवादनपर भाषण होईल.
या संपूर्ण परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबई पोलीस, पालिका प्रशासन आणि समता दलाचे सैनिक यांच्यामार्फत या संपूर्ण परिसरावर करडी नजर आहे. महानगरपालिकेकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही सुरक्षा चौकी, वैद्यकीय सुविधा आणि इतर सार्वजनिक सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. अनुयायांसाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे निवासाची, खाण्या-पिण्याची व्यवस्था केलेली आहे.