मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी निळे ध्वज फडकावीत दादरच्या चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. डोक्यावर निळा फेटा, पांढरेशुभ्र कपडे परिधान केलेले अनुयायी एकच टोला भीमटोला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो आशा घोषणा देत 5 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी रांगेत उभे आहेत. शनिवारी तर अख्खी मुंबईच ‘जय भीम’च्या घोषणांनी दुमदुमून जाणार आहे.
5 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासूनच महामानवाच्या दर्शनासाठी आंबडकरी अनुयायींनी रांगा लावल्या आहेत. त्यांच्यासाठी चैत्यभूमी समिती, मुंबई पोलीस आणि महापालिका प्रशासनाने अनुयायींची चोख व्यवस्था केली आहे. रांगेतील अनुयायींची गैरसोय होऊ नये, म्हणून महापालिकेने तात्पुरते छत असलेली 150 बाकडी जागोजागी ठेवली आहेत. त्यामुळे वयोवृृद्ध, अपंग यांच्यासह थकलेल्या अनुयायींना तेथे विश्रांती घेता येणार आहे.
चैत्यभूमीवर बाबासाहेबांचे दर्शन झाल्यानंतर अनुयायींची पावले शिवाजी पार्क मैदानाकडे वळतात. त्यामुळे येथे बाबासाहेबांच्या विविध विषयांवरील पुस्तके, ग्रंथांचे स्टॉल्स लागले आहेत. यासह बाबासाहेबांची छायाचित्रे, पुतळे यांचेही स्टॉल्स लागले आहेत. स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष, शासकीय व खासगी कार्यालय यांच्यावतीने मोफत जेवण, पाणी व अल्पोपाहाराची व्यवस्था केली आहे.
राज्यभरांतून आलेल्या या अनुयायींनी शिवाजी पार्कमधील मंडपात आसरा घेतला आहे. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून त्यांनी येथे विसावा घेतला असून 6 डिसेंबर रोजी बाबासाहेबांना अभिवादनासाठी ते आतुरलेले आहेत. सुमारे पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांनीही नियोजन केले आहे. अनुयायींची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे, मेट्रोसह बेस्ट प्रशासनानेही खास व्यवस्था केली आहे.
चोरट्यांवर लक्ष
गर्दीचा फायदा घेऊन काही भुरटे चोरटे सोनसाखळी, पाकीटमारी करीत असल्याने साध्या वेशातील काही पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. शिवाजी पार्क परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने संपूर्ण गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.
वाहतूक बदल
वाहतूक पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली आहे. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून दादर परिसरातील काही मार्गांवर एकेरी वाहतूक तर काही मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत. काही ठिकाणी पार्किंगला पूर्णपणे बंदी ठेवण्यात आली आहे.
येथे करा संपर्क
आवश्यक प्रसंगी नागरिकांनी पोलीस मदतीसाठी पोलीस हेल्पलाईन क्रमांक 100 किंवा 112 वर संपर्क साधावा.