

मुंबई: देशातील मोठ्या बेकायदा ऑनलाइन सट्टेबाजी नेटवर्कपैकी एक असलेल्या महादेव ऑनलाइन बुक बेटिंग अॅपचा प्रमुख सूत्रधार सौरभ चंद्राकर याला अखेर ओमानमधून भारतात आणण्यात सीबीआयला यश आले आहे.
सीबीआयने अन्य केंद्रीय तपास यंत्रणांच्या समन्वयाने त्याचे प्रत्यार्पण मिळवले. सीबीआयचे विशेष पथक त्याला मस्कत येथून भारतात घेऊन आले असून, उद्या त्याला रायपूर येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
सौरभ चंद्राकर याच्याविरुद्ध सीबीआयने दाखल केलेल्या दोन स्वतंत्र गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल झाले आहे. तसेच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या गुन्ह्यातही खटला चालविण्यासाठीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
छत्तीसगड सरकारच्या विनंतीवरून सीबीआयने महादेव बेटिंग प्रकरणाचा तपास हाती घेतला होता. तपासात या अॅपच्या माध्यमातून क्रिकेट, फुटबॉल, पत्त्यांचे खेळ तसेच अन्य स्पर्धांवर बेकायदा सट्टा लावला जात असल्याचे समोर आले होते. देशभरात फ्रँचायझी पद्धतीने पॅनेल आणि शाखांचे जाळे उभारून ग्राहकांची नोंदणी केली जात होती. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सट्ट्याचे पैसे गोळा केले जात होते.
चंद्राकरविरुद्ध इंटरपोलमार्फत रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. या नोटिशीच्या आधारे त्याचा ठावठिकाणा शोधून ओमानच्या रॉयल पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर सीबीआय व ईडीने भारत सरकारच्या संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने ओमानकडे प्रत्यार्पणाचे औपचारिक प्रस्ताव पाठवले.
आरोपीविरुद्ध तपासात गोळा करण्यात आलेले पुरावेही ओमानच्या अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. प्रत्यार्पणाला मंजुरी मिळाल्यानंतर सीबीआयचे विशेष पथक मस्कत येथे गेले व चंद्राकर याला ताब्यात घेऊन भारतात परतले. भारतात आणल्यानंतर सौरभची वैद्यकीय तपासणी केली जाणार असून, ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला रायपूर येथे नेण्यात येईल. उद्या त्याला सीबीआयच्या विशेष न्यायाधीशांसमोर हजर केले जाणार आहे.
आरोपी चंद्राकरचे महाराष्ट्र कनेक्शन
महादेव बेटिंग अॅप प्रकरणाचे महाराष्ट्र, विशेषतः मुंबईशी थेट आर्थिक आणि तपासाचे कनेक्शन आहे. त्याच्या भारतातील नेटवर्कचा तपास करताना मुंबईतील गुन्हा, हवाला व्यवहार, इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या आणि आर्थिक मध्यस्थांची भूमिका समोर आली होती.
७ नोव्हेंबर २०२३ रोजी मुंबईतील माटुंगा पोलीस ठाण्यात कथित सट्टेबाजी आणि सायबर फसवणुकीप्रकरणी ३२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये सौरभ चंद्राकर, रवी उप्पल आणि शुभम सोनी यांचाही समावेश होता.
मुंबईत ईडीचे छापे
२८ फेब्रुवारी २०२४ रोजी ईडीने महादेव बेटिंग अॅप प्रकरणात देशभरातील १७ ठिकाणी छापे टाकले. त्यापैकी तीन ठिकाणे मुंबईतील होती. सट्टेबाजीतील पैसा हवाला मार्गाने दुबई आणि अन्य परदेशी ठिकाणी पाठविल्याचा तपास यावेळी करण्यात आला.
आरोपी चंद्राकरचे महाराष्ट्र कनेक्शन
महादेव बेटिंग अॅप प्रकरणाचे महाराष्ट्र, विशेषतः मुंबईशी थेट आर्थिक आणि तपासाचे कनेक्शन आहे. त्याच्या भारतातील नेटवर्कचा तपास करताना मुंबईतील गुन्हा, हवाला व्यवहार, इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या आणि आर्थिक मध्यस्थांची भूमिका समोर आली होती. ७ नोव्हेंबर २०२३ रोजी मुंबईतील माटुंगा पोलीस ठाण्यात कथित सट्टेबाजी आणि सायबर फसवणुकीप्रकरणी ३२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये सौरभ चंद्राकर, रवी उप्पल आणि शुभम सोनी यांचाही समावेश होता.
बॉलिवूड सेलिब्रिटींची चौकशी
महादेव अॅपच्या जाहिराती आणि प्रमोशनसाठी काही बॉलिवूड कलाकारांनी काम केल्याचे ईडीच्या तपासात समोर आले होते. रणबीर कपूर, श्रद्धा कपूर, हुमा कुरेशी, नुसरत भरुचा व सनी लिओनी यांच्यासह काही कलाकारांची नावे या प्रकरणाच्या संदर्भात चर्चेत आली होती.
लग्नाचे मुंबई कनेक्शन
फेब्रुवारी २०२३ मध्ये दुबईत झालेल्या सौरभ चंद्राकरच्या भव्य विवाह सोहळ्यासाठी मुंबईतील इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या, डेकोरेटर्स, डान्सर्स आणि अन्य व्यावसायिकांची सेवा घेण्यात आली होती. ईडीच्या तपासानुसार या सोहळ्यावर सुमारे २०० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
इव्हेंट कंपनीमार्फत ११२ कोटींचे व्यवहार
मुंबईतील आर-१ इव्हेंट्स प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित योगेश पोपट यांच्या माध्यमातून ११२ कोटी रुपये हवाला मार्गाने पोहोचवण्यात आल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले होते. या व्यवहारांशी संबंधित अंगडिया व्यावसायिकांच्या ठिकाणीही झडती घेण्यात आली होती.