

मुंबई : पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस वितरक कंपन्यांनी व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलिंडर ग्राहकांना महिन्यातून एकच गॅस सिलिंडर देण्याबाबत केंद्र सरकारने सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सिलिंडर बुकिंगचा आधीचा 15 दिवसांचा कालावधी आता 10 दिवसांनी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे आता 25 दिवसांनंतरच सिलिंडर बुकिंग होईल आणि त्यानंतर सिलिंडरच्या डिलिव्हरीसाठी दोन-चार दिवस जातील म्हणजे एकंदरीत ग्राहकांना महिन्याला एकच गॅस सिलिंडर मिळणार आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा कालावधी वाढला असला, तरी तो कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय अचानक लागू झाल्याने काही ग्राहकांचा गोंधळ उडाला.
‘एलपीजी’ गॅसचा वापर घरात स्वयंपाकासाठी केला जातो. नागरिकांना दोन सिलिंडर वापरण्याची परवानगी असते. त्यासाठी पहिला सिलिंडर वापरायला सुरुवात केल्यानंतर 15 दिवसांनी दुसरे बुकिंग करता येत होते, आता अचानक हा कालावधी वाढविण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात गॅस दरात 60 रुपयांची वाढ झाली होती, त्यानंतर ग्राहकांना हा दुसरा धक्का बसला आहे.
आखाती देशांतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गॅस वितरक कंपन्यांना व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलिंडरबाबत सूचना दिल्या असून, त्यानुसार महिन्यातून एकच सिलिंडर देता येणार आहे. जिल्ह्यातील सर्व गॅस वितरक केंद्रांना तसे लेखी आदेश देण्यात आले आहेत. पुरवठा सुरळीत होईल, या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. ग्राहकांनी गॅस आरक्षणासाठी एकाच वेळी ऑनलाईन प्रक्रिया केल्याने यंत्रणेवर ताण येत असल्याने समस्या निर्माण होत आहे, असे पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले.
पहिल्यांदा महिन्यातून दोन गॅस सिलिंडर देता यायचे. आता मात्र युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना महिन्यातून एकच गॅस सिलिंडर देण्याचे लेखी आदेश केंद्र सरकारकडून एजन्सींना देण्यात आले आहेत. त्यानुसार गॅसचे वितरण होणार आहे, असे एका गॅस वितरण कंपनीकडून सांगण्यात आले.
सोशल मीडियावर पसरत असलेल्या इंधन तुटवड्याच्या बातम्या दिशाभूल करणाऱ्या आणि निराधार आहेत. देशामध्ये इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी काळजी करण्याची कोणतीही गरज नाही, असे आश्वासन देण्यात येत आहे. असे असले तरी स्वयंपाकाचा गॅस जपून वापरावा, असे इंधन कंपन्यांनी म्हटले आहे.
बुकिंगसाठी वाढवण्यात आलेला कालावधी हा कंपन्यांनी घेतलेला निर्णय आहे. पहिल्या बुकिंगनंतर 25 दिवसांनीच ग्राहकाच्या रजिस्टर्ड मोबाईलवरून बुकिंग होत आहे. त्याच्या आधी हे बुकिंग घेत नसल्याने डिलिव्हरी देता येत नाही, असे एका वितरण कंपनीकडून सांगण्यात आले.