

Maharashtra Local Body Elections
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा दौरा करतील. या दौऱ्यात निवडणुकीच्या तयारी संदर्भात आढावा घेतला जाईल, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी (दि. १४ जुलै) दिली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार का? यावर बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, मी स्पष्ट केलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका होतील. ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. देवेंद्र फडणवीस निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. यादरम्यान धोरणात्मक निर्णय आवश्यक आहेत आणि ते घेतले जातील.
ठाकरे गटाचे मालवणमधील माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा आज रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश झाला. यावेळी चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत भाजपच्या तयारीबाबत भाष्य केले. ''पीएम मोदी आणि फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र वेगाने पुढे जात आहे. जनतेचा विश्वास फडणवीसांवर आहे. लोकप्रतिनिधी आज भाजपकडे आशेने पाहत आहेत. भाजप न्याय देईल, अशी त्यांना अपेक्षा आहे. देवेंद्र फडणवीस हे विश्वासार्ह चेहरा म्हणून लोकांना वाटत आहेत. कोकणचा सर्वांगीण विकास आवश्यक आहे. कोकणातील स्थलांतरण रोखणे आवश्यक आहे. त्यासाठी रोजगार निर्मिती गरजेची आहे. अनेक प्रकल्प देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आकारले जात आहेत,'' असे चव्हाण यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने कंबर कसली आहे. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आजपासून विभागीय आढावा बैठक घेतल्या जात आहेत. आज कोकणातील संघटनात्मक स्थिती आणि तयारीचा आढावा घेतला जात आहे. भाजप मंडल अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, मोर्चाचे अध्यक्ष, संघटन मंत्र्यांच्या उपस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत खलबते होणार आहेत. पुढील ४ दिवस भाजप प्रदेश कार्यालयात विभागवार आढावा बैठक होणार असल्याचे समजते.