

LLB CET 2025 new date
मुंबई : राज्यातील विधी महाविद्यालयात एलएलबी ३ वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची सीईटी ३ आणि ४ मे रोजी पाच सत्रात आयोजित करण्यात आली होती. त्यात सीईटी सेलने बदल करून ४ मे रोजी होणारी परीक्षा दोन दिवस आधी म्हणजेच २ मे रोजी घेतली जाणार आहे.
यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचे हॉलतिकीट आणि बदलण्यात आलेल्या तारखेची माहिती त्यांच्या ईमेल आणि एसएमएसच्या माध्यमातून दिली जाणार असल्याची माहिती सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी सोमवारी मुंबईत दिली. ४ मे रोजी नीट ची परीक्षा असून त्या दिवशी राज्यातील अनेक परीक्षा केंद्र यामुळे व्यापून राहणार आहेत, त्यामुळे एलएलबीची सीईटी देणाऱ्या सुमारे ९ हजार विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र आणि इतर अडचणी येत होत्या. त्यामुळे ४ मे रोजीची परीक्षा ही आता २ मे रोजी होईल, अशी माहिती आयुक्तांनी दिली.
विद्यार्थ्यांना आजच एलएलबीची सीईटीचे अॅडमिट कार्ड आणि त्यात परीक्षा त्यांच्या बदलण्यात आलेल्या तारखा याची माहिती दिली जाणार आहे. एलएलबी सीईटी ही परीक्षा २ मे रोजी तीन सत्रात तर ३ मे रोजी दोन सत्रात होईल. यात सुमारे ९५ हजार विद्यार्थी परीक्षेला बसतील.