सरदार पटेलांप्रमाणेच पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्र्यांची ३७० कलम हटविण्याची हिंमत : मुख्यमंत्री

CM Eknath Shinde
CM Eknath Shinde

मुंबई: पुढारी वृत्तसेवा: भारतात १९४८ मध्ये निजामाविरुद्ध पोलीस ॲक्शनद्वारे कारवाई करत तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी हैदराबाद संस्थानाला स्वतंत्र करून देशात विलीन केले. त्याप्रमाणे सध्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली कश्मीर मधून ३७० कलम हटविण्याची हिंमत दाखविली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. हैदराबाद मुक्ती संग्रामानिमित्त हैदराबाद येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी आयोजित केलेल्या हैद्राबाद मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महाराष्ट्र तेलंगणा आणि कर्नाटक अशा तीनही राज्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी दर्शकांची मने जिंकून घेतली. विशेषतः महाराष्ट्राच्या ढोल ताशाच्या पथकांनी तर वातावरणात चैतन्य निर्माण केले. यावेळी आदिलाबादच्या पथकांनी लांबाडी तसेच गुसाडी, चिडूतालु, कोलाटम ही नृत्ये सादर केली. कर्नाटक पथकाने डोला कुनिथा बँड वाजविला. परेडमध्ये लष्कराच्या दलांनी, एनसीसी विद्यार्थ्यांनी देखील संचालन करून वाहवा मिळविली.

या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्यावर माझा पहिला कार्यक्रम होता. देशव्यापी हर घर तिरंगा मोहीम. राज्यातल्या अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकावून आम्ही ही मोहीम यशस्वी करून दाखवली. आज देशात प्रथमच केंद्र सरकारने हैदराबाद राज्याचा मुक्तिसंग्राम कार्यक्रम सुरू करून हा मुक्ती संग्राम नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा मोठा प्रयत्न केला आहे. आम्हाला याचा अभिमान आहे.

हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन मराठवाड्यामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासारख्या स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेला लढा आजही आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. हैदराबाद मुक्तिसंग्राम हा निजामासारख्या क्रूर शासकापासून मुक्ती मिळवण्याचा दिवस आहे. हा दिवस म्हणजे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना नमन करण्याचा आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news