बेळगाव : ५०० शर्यती जिंकणाऱ्या ‘नाग्या’ बैलाची चटका लावणारी एक्झिट
बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : वडगाव येथील बैलगाडी शर्यतप्रेमी कै. परशराम मल्लाप्पा पाखरे यांच्या 'नाग्या' या बैलाचे आज (दि.१८) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतीत बेळगावचा डंका पिटणाऱ्या नाग्या बैलाच्या निधनावर हळहळ व्यक्त केली जात आहे. वडगाव स्मशानभूमीत त्याच्यावर आज ( दि. १८) सायंकाळी ६ वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
२१ वर्षांपूर्वी '१ लाख ६२ हजार रुपयांना खरेदी
वडगाव येथील बैलगाडी शर्यतप्रेमी कै. परशराम मल्लाप्पा पाखरे यांनी २१ वर्षांपूर्वी 'नाग्या' बैलाला १ लाख ६२ हजार रुपयांना अंकलगी येथून खरेदी केले होते. नाग्याने आपल्या जीवनातील पहिली शर्यत अनगोळ येथे खेळली. या पहिल्याच शर्यतीत त्याने पहिला क्रमांक पटकावला. त्यानंतर त्याने कधी मागे वळून पाहिलेच नाही. तब्बल ५०० हून अधिक शर्यती जिंकत तो शर्यतीमधील हिंदकेसरी किताबाचा मानकरी ठरला.
नाग्या शर्यतीत उतरला की त्याच्याभोवती लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंतचे कडे निर्माण व्हायचे. शर्यत प्रेमींच्या गळ्यातील ताईत बनलेला नाग्याने आज साऱ्यांचा निरोप घेतला. कारभार गल्ली, वडगाव येथील मारुती परशराम पाखरे व संजय परशराम पाखरे यांच्या निवासस्थानाहून दुपारी दाेनच्या सुमारास नाग्याची अंत्ययात्रा काढून सायंकाळी ६ वाजता वडगाव येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. बैलगाडी शर्यतप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनलेल्या नाग्याने आपल्या ह्यातीत ५०० हून अधिक शर्यती जिंकल्या होत्या. त्याने केवळ पाखरे कुटुंबीयांचेच नव्हे, तर बेळगावचे नाव लौकिक केले होते.
हेही वाचलंत का ?