

Lalbaugcha Raja
मुंबई : लालबागच्या राजाचा 'मुहूर्त पूजन' सोहळा आज (दि. १४) संपन्न झाला. लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदा ९२ वे वर्ष आहे. गणेशोत्सवाची तयारी पाद्य पूजनाने सुरू झाली असून आता बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागली आहे.
यंदाच्या गणेशोत्सवाची तयारी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने जोरात सुरू केली आहे. आज सकाळी ६ वाजता लालबागच्या राजाचे मूर्तिकार कांबळी आर्ट्स यांच्या कार्यशाळेत हा पारंपरिक गणेश मुहूर्त पूजन सोहळा संपन्न झाला. मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या हस्ते 'गणेश मुहूर्त' पूजन पार पडले. यावेळी मंडळाचे खजिनदार मंगेश दत्ताराम दळवी यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पावती पुस्तकांचेही पूजन केले. या पूजनाने उत्सवाच्या कार्याला सुरुवात झाली आहे.
यावर्षी लालबागच्या राजाचा ९२ वा गणेशोत्सव सोहळा गणेशचतुर्थी, बुधवार दि. २७ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होणार असून, अनंतचतुर्दशी, शनिवार, दि. ६ सप्टेंबर २०२५ पर्यंत साजरा केला जाईल. या काळात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.