मुंबई : मुंबईचा गणेशोत्सव म्हटला की जी काही सार्वजनिक मंडळांची नावे पुढे येतात, त्यात लालबागच्या राजाचा (Lalbaugcha Raja) अग्रक्रम लागतो. केवळ मुंबईच नव्हे, तर देशभरातील गणेशभक्तांमध्ये लालबागच्या राजाचे वेगळे स्थान आहे. यावर्षी हे मंडळ 91 व्या वर्षात पदार्पण करत आहे.
1934 साली लालबागच्या राजाची स्थापना झाली. मुंबईचे कोळी आणि इतर व्यापारी बांधवांनी केलेल्या नवसानंतर लालबागचा राजा पहिल्यांदा स्थानापन्न झाला. नवसाला पावणारा गणपती म्हणून त्याची कीर्ती पसरत गेली. तब्बल 24 तासांहून अधिक वेळ रांगेत उभे राहून लालबागच्या राजाचे दर्शन घेतले जाते. यावर्षी प्रसिद्ध उद्योगपती अंबानी कुटुंबीयांनी लालबागच्या राजाला 15 कोटी रुपयांचा मुकूट अर्पण केला आहे.
स्वातंत्र्यानंतर या गणेशोत्सव मंडळाने राष्ट्रीय कार्यात हातभार लावण्यास सुरुवात केली. मंडळाकडे शिल्लक असलेल्या पैशातून बिहार पूरग्रस्त निधीस मदत करण्यात आली. त्यामुळे लालबागच्या राजाची (Lalbaugcha Raja) महती देशभर पसरली. 1950 नंतर लालबागच्या गणेशोत्सवाला भव्य-दिव्य स्वरूप प्राप्त झाले. याच दरम्यान चांगले सामाजिक कार्य करणार्या व्यक्तींचा सत्कार करण्याची प्रथा सुरू झाली.
लालबागच्या राजाचा (Lalbaugcha Raja) पाद्यपूजन सोहळा, मुखदर्शन आणि विसर्जन मिरवणूक हे सोहळे मोठ्या थाटात साजरे होतात. राजाच्या दर्शनासाठी लाखोंच्या प्रमाणात भाविक गर्दी करतात. मिरवणुकीत पारंपरिक लेझीम, ढोल-ताशा पथकांचा सहभाग असतो.