

कोपरखैरणे : येथील एका सोसायटीत खासगी शिकवणी वर्ग सुरू असतानाच घराचा स्लॅब कोसळून ढिगाऱ्याखाली एका शिक्षिकेसह 12 विद्यार्थी अडकले. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत त्यांना बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. मात्र मनीष म्हसे (वय 13) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.
कोपरखैरणे सेक्टर 2 मधील प्लॉट क्रमांक 12 वरील विद्याभवन सोसायटीत गुरुवारी सायंकाळी 5.20 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या सोसायटीत 16 कुटुंबे वास्तव्यास आहेत. तळमजल्यावरील घरात खासगी शिकवणी वर्ग भरवले जात होते. गुरुवारी सायंकाळी हे वर्ग सुरू असताना पहिल्या मजल्यावरील स्लॅब निसटून त्यांच्यावर कोसळला.
वाशी, कोपरखैरणे आणि ऐरोली येथील अग्निशमन दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तातडीने सर्व विद्यार्थी आणि शिक्षिकेस बाहेर काढले. मात्र, मनीष म्हसे या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिली. इतर विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.
नवी मुंबईत सुमारे 65 इमारती अतिधोकादायक आहेत. या दुर्घटनेनंतर जुन्या इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्लॅब कोसळण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी ही इमारत जुनी होती आणि ती धोकादायक असल्याचे पालिकेने जाहीर केलेल नव्हते. परिणामी, हा प्रकार घडला.
रहिवाशांना हलवले
या इमारतीचे बांधकाम 1997 साली झाले असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या इमारतीत सुमारे आठ कुटुंबे वास्तव्यास आहेत. दुर्घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून सर्व रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
जखमी विद्यार्थी
सिद्धांत गुप्ता (8), प्रिन्स सोनी (11), आयशा खान (11), कुलसुम खान (15), निष्का धनवाडे (14), मनीष म्हसे (13), आराध्या बोडसे (14), तन्वी श्रीवास्तव (7), देवांश पुजारी (12), राजदीप वानखेडे (10), पार्थ खैरनार (14), रुद्र येलूरकर (5) आणि शिक्षिका शामली चौधरी (53).