

Konkan Railway |
मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व ट्रेन हाऊसफुल असून वेटिंग तिकीटही आता मिळत नाही. त्यामुळे चाकरमान्यांना गावात जाऊक जनरल डब्याचो आधार उरलो असा.. पण जनरल डब्यातील तुडुंब गर्दी लक्षात घेता, गावी जायचे कसे असा प्रश्न मुंबई, ठाण्यातील हजारो चाकरमान्यांना पडला आहे.
उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात आपल्या कुटुंबासोबत जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या सर्वाधिक असते. त्यामुळे २० एप्रिल नंतर १५ मे पर्यंत कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांना तुफान गर्दी असते. अनेकजण कोकण रेल्वेचे आगाऊ आरक्षण करतात तर काहीजण दाम दुप्पट पैसे देऊन तत्काळ कोट्यामध्ये आरक्षण करतात. पण तत्काळ कोटा प्रत्येक कोकणी माणसाला आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही. ५०० रुपये तिकीट असेल तर एजंट थेट १२०० ते १५०० रुपये एका तिकीटाचे घेतात. त्यामुळे एका कुटुंबातून पाचजण गावी जाण्यास निघाल्यास ५ ते ६ हजार रुपये केवळ भाड्यासाठी मोजावे लागतात.
अनेकजण वेटिंग तिकीट घेऊन थेट स्लीपरच्या डब्यातून प्रवास करतात. याचा त्रास वेटिंग तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्यांनाच होत नाही तर आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनाही सहन करावा लागतो. त्यामुळे रेल्वेनेही वेटिंग तिकीटवाल्यांची भोजपुरी लक्षात घेऊन, ठराविक वेटिंग तिकीट दिल्यानंतर तिकीट देणे बंद केले जाते. त्यामुळे ऐनवेळी तिकीट काढायला गेलेल्या चाकरमान्यांना तिकीट मिळत नाही. त्यामुळे जनरल डब्यातून घुसून जाण्याशिवाय चाकरमान्यांसमोर पर्याय उरत नाही. सध्या कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या कोकण कन्यासह तुतारी, मांडवी, दिवा सावंतवाडी पॅसेंजर व अन्य गाड्या हाऊसफुल असून यांचे वेटिंग तिकीट मिळणेही आता बंद म्हणजे रिग्रेट झाले आहे.
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचे तत्काळ तिकीट काढण्यासाठी चाकरमान्यांची धडपड असते. पण हे तिकीट चाकरमान्यांना कधी मिळालेच नाही. रात्रीपासून मुंबईतील आरक्षण केंद्रावर बाहेर रांगा लावूनही कधी कधी पहिला क्रमांक असलेल्या नागरिकालाही तिकीट मिळत नाही. मात्र ही तिकिटे एजंटकडे मात्र दामदुप्पट भावाने सहज मिळतात. यावरून एजंटची मक्तेदारी दिसून येते. पण दामदुप्पट भाड्याचे तिकीट सामान्य चाकरमान्यांना परवडणारे नसल्याने अशी तिकीटे ज्यांच्याकडे पैसा आहे असे प्रवासी घेतात व आपला प्रवास सुखाचा करतात, असे चित्र पहावयास मिळत आहे.