

मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर धावणार्या एक्सप्रेस गाड्यांच्या स्लीपर कोच डब्यातील घुसखोरी नवीन नाही. आता तर सुपरफास्ट जनशताब्दी एक्सप्रेसच्या डब्यातही वेटिंग तिकीटसह जनरल तिकीट असलेल्या प्रवाशांची घुसखोरी होऊ लागली आहे. त्यामुळे आगाऊ आरक्षण करणार्या प्रवाशांची अक्षरश: गैरसोय होत असून प्रवासही खडतर होत आहे.
एक्सप्रेस गाड्यांच्या आरक्षित डब्यांमध्ये वेटिंग तिकीटवाल्यांना प्रवेश नसल्याचे रेल्वेकडून अनाउन्समेंटद्वारे सतत सांगण्यात येते. एवढेच काय तर वेटिंग तिकीटवाले आरक्षित डब्यात चढल्यावर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सह त्यांना गाडी बाहेर उतरवण्यात जाईल असा इशाराही देण्यात येतो. पण कोकण रेल्वे मार्गावर याची अंमलबजावणी आतापर्यंत कधीच झालेली नाही. त्यामुळे आगाऊ आरक्षण करणार्या प्रवाशांची कुचंबना होत आहे.
‘जनशताब्दी’च्या एसी वगळता सर्व डब्यांमध्ये वेटिंग तिकीटवाल्यांची घुसखोरी वाढली असल्याची खंत कोकणवासीयांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त केली आहे. डब्यातील घुसखोरीचा फोटो फेसबुक, इंस्टाग्रामवर टाकून, सत्य परिस्थिती रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली जात आहे. गर्दीमुळे दोन आसनांच्यामध्ये प्रवासी असतात त्यामुळे आरक्षित तिकीटवाल्यांना नीट प्रवास करता, येत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.
कोकण रेल्वे मार्गावर धावणार्या सर्वच गाड्यांना प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. अनेकांच्या वेटिंग तिकीट असतात. त्यांना डब्याबाहेर काढले जाते. परंतु ते पुन्हा दुसर्या डब्यात चढतात. काहींवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. पण प्रत्येक प्रवाशावर कारवाई करणे शक्य होत नाही, त्यामुळे घुसखोरी थांबवणे शक्य होत नसल्याची अशी खंत कोकण रेल्वे मार्गावरील टीसींनी व्यक्त केली.