

मुलुंड : मुलुंड पश्चिमेकडील नाहूर गाव परिसरात मुंबई महापालिका 166 कोटी रुपये खर्चून जागतिक दर्जाचे पक्षी उद्यान उभारणार असून यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. हे उद्यान वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे (भायखळा) उपकेंद्र असणार आहे.
हे उद्यान पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासाप्रमाणेच असणार असून, प्रशस्त आणि नैसर्गिक निवारे असणार आहेत. पक्षी उद्यानात खुला प्लाझादेखील असणार असून त्यात धबधबे आणि पाण्याचे प्रवाह वाहतील. या उद्यानात संवादात्मक कार्यक्रम, कार्यशाळा आणि पक्षीतज्ज्ञांची व्याख्यानेही होणार आहेत. या पक्षी उद्यानामुळे पूर्व उपनगरात राहणार्या नागरिकांसोबतच नवी मुंबई आणि ठाणेकरांनाही निसर्गाचा आस्वाद व पक्षी उद्यान पाहता येणार आहे.
विविध दुर्मीळ प्रजातीचे पक्षी पर्यटकांना पाहता यावेत, यासाठी मुंबई महापालिका हे पक्षी उद्यान उभारत आहे. हे उद्यान मार्गी लावण्यासाठी महापालिकेने पक्षी उद्यानाच्या कामासाठी निविदा काढली असून ती भरण्याची अंतिम तारीख 19 सप्टेंबर आहे. उद्यान ज्या महापालिका भूखंडावर होणार आहे, तो भूखंड गार्डन आणि पार्कसाठी आरक्षित आहे. हे आरक्षण बदलल्याशिवाय प्रकल्प पुढे सरकू शकत नव्हता. त्याला नगरविकास विभागाकडूनही नुकतीच मंजुरी मिळाली आहे. या पक्षी उद्यानात नैसर्गिक निवारे असणार असून येथे जागतिक दर्जाची सुविधा निर्माण करण्यासाठी प्रसिद्ध अशा जुरोंग पक्षी उद्यानाशीही सहकार्य करण्याचा पालिकेचा प्रयत्न असून तसा प्रस्ताव विचाराधीन आहे.