

मुंबई : रविवार रात्रीपासून कोसळणार्या मुसळधार पावसाने सोमवार दुपारपर्यंत चांगलाच जोर धरला होता. विजांच्या गडगडाटासह पाऊस कोसळत असल्याने अनेकांनी घरीच राहणे पसंत केले. तर पावसाचा जोर वाढत असल्याने चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, चुनाभट्टीत अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
चेंबूरच्या पोस्टल कॉलनी, मॉ रुग्णालयासमोरील रस्ता, शेल कॉलनी, वाशीनाका, पी. एल. लोखंडे मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर झाला होता. तर मानखुर्दच्या महाराष्ट्रनगर येथील भुयारी मार्गात पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली होती. मानखुर्दच्या महात्मा फुले नगर, महाराष्ट्र नगरातील अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने त्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. मागील तीन महिन्यांत तब्बल 7 ते 8 वेळा घरात पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले. आधीच हातावर पोट त्यात महिनाभराचे रेशन वाहून गेल्याने येथील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर अशीच अवस्था चुनाभट्टीच्या स्वदेशी कामगार वसाहतीची झाली आहे. त्या ठिकाणी देखील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नुकसान झाले. दुपारनंतर पावसाने विसावा घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.