

BMC Election Results Live Updates 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपने आघाडी घेतली आहे. काही प्रभागांमधून निकाल स्पष्ट होत असताना भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे, तर ठाकरे गटासाठी काही ठिकाणी मोठा धक्का बसल्याचं चित्र आहे.
दहिसरमधील प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजपच्या तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांनी जोरदार मुसंडी मारत 10,725 मतांनी मोठा विजय मिळवला आहे. त्यांनी शिवसेना (ठाकरे गट)च्या धनश्री कोलगे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. हा निकाल राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या निधनानंतर या जागेकडे सर्वांचं लक्ष होतं आणि ठाकरे गटासाठी ही लढत प्रतिष्ठेची बनली होती. मात्र मतदारांनी तेजस्वी घोसाळकर यांच्या बाजूने कौल दिला.
या निकालानंतर दहिसर परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला असून गुलाल उधळत आनंद व्यक्त केला जात आहे. प्रचारादरम्यान तेजस्वी घोसाळकर यांनी मांडलेले विकासाचे मुद्दे आणि मतदारांमध्ये निर्माण झालेली सहानुभूती, या दोन्ही गोष्टी त्यांच्या विजयामागे महत्त्वाच्या ठरल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, आणखी एका प्रभागात भाजपचा विजय झाला आहे. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन हे मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीअखेरही आघाडीवर होते. उपलब्ध माहितीनुसार नवनाथ बन यांना 3,722 मते मिळाली असून ते 1,656 मतांनी पुढे होते.
त्यांच्या विरोधात शिवसेना (ठाकरे गट)च्या समीक्षा सक्रे यांना 2,066 मते मिळाल्याची माहिती आहे. मतमोजणीच्या शेवटी भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी विजय मिळवला आहे. एकूणच, मुंबईतील काही महत्वाच्या प्रभागांमध्ये भाजपला मोठी आघाडी मिळत असल्याचं चित्र आहे.