BMC election results 2026 : 'रसमलाई' पोस्ट करत भाजप खासदारांनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली!
मुंबई महानगरपालिका निवडणूक प्रचार काळात आयोजित जाहीर सभेत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी भाजप नेते के. अण्णामलाईंवर टीका केली होती. त्याला आता बेंगळुरूच्या भाजप खासदारांनी प्रत्युत्तर दिले आहे.
BJP MPs mock Raj Thackeray with rasmalai after BMC election results
बंगळूर : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय आता दृष्टिक्षेपात आला आहे. मुंबईबरोबरच महाराष्ट्रातील अन्य महापालिका निवडणुकीतही भाजपचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे. या निकालानंतर बंगळूर सेंट्रलचे भाजप खासदार पी.सी. मोहन यांनी आज (दि. १६) 'रसमलाई'चा फोटो शेअर करत राज ठाकरेंची खिल्ली उडवली आहे.
"रसमलाई मागवली आहे..."
मुंबई महानगरपालिकेचे निकाल स्पष्ट होताच बंगळूर सेंट्रलचे भाजप खासदार पी.सी. मोहन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यांनी 'X' वर रसमलाई मिठाईचा फोटो शेअर करत लिहिले: "काही रसमलाई मागवली आहे. #BMCResults." ही पोस्ट थेट राज ठाकरे यांनी भाजप खासदार के. अण्णामलाईंवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर आहे.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
मुंबई हे केवळ महाराष्ट्राचे नाही, तर ते एक आंतरराष्ट्रीय शहर आहे, असे विधान तामिळनाडू भाजपचे नेते के. अण्णामलाई यांनी केले होते. मुंबईत ठाकरे बंधूंची शिवतीर्थवर जाहीर सभा झाली होती. यावेळी राज ठाकरे यांनी के. अण्णामलाई यांच्या विधानाचा समाचार घेताना अण्णामलाई यांची 'रसमलाई' म्हणून खिल्ली उडवली होती. मुंबईबद्दल भाष्य करण्याची त्यांची हिम्मत होतेच कशी, असा सवालही त्यांनी केला होता. "हटाव लुंगी, बजाव पुंगी" ही घोषणा देखील दिली होती.
अण्णामलाईंनीही दिले होते प्रत्युत्तर
अण्णामलाई यांनीही राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले होते. ते म्हणाले होते की, "काही लोकांनी मी मुंबईत आल्यास माझे पाय कापण्याची धमकी दिली होती. मी मुंबईत नक्की येणार, माझे पाय कापून दाखवाच." "जर मी के. कामराज यांच्यासारख्या नेत्यांची प्रशंसा केली तर त्यांची तमिळ ओळख कमी होत नाही. त्याचप्रमाणे मुंबईला जागतिक दर्जाचे शहर म्हणल्याने ते घडवण्यात महाराष्ट्रीयन लोकांचे असलेले योगदान पुसले जात नाही," असा खुलासाही त्यांनी केला होता. तसेच ठाकरे बंधूंनी लुंगी आणि वेष्टी यांसारख्या पारंपारिक पोषाखांची थट्टा करून तमिळ लोकांचा अपमान केल्याचा आरोपही केला होता.
हरियाणातील विजयानंतर भाजपने राहुल गांधींना पाठवली होती जलेबी
'रसमलाई'च्या आधी भाजपने 'जलेबी' वाटून विजय साजरा केला होता. २०२४ मध्ये हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवल्यानंतर, ऐतिहासिक पुनरागमन साजरा करण्यासाठी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या दिल्लीतील कार्यालयात १ किलो जलेबी पाठवून काँग्रेसला टोला लगावला होता.

