

मुंबई : मुंबई -नाशिक महामार्गावरील खारेगाव अंडरपासच्या रुंदीकरणाचे काम सुरू झाल्यामुळे या मार्गावरील वाहतुकीवर चार महिन्यांपेक्षा अधिक काळ निर्बंध लादले जाणार आहेत. सदर अंडरपास 15 डिसेंबरपासून 9 एप्रिलपर्यंत खासगी व अवजड वाहनांसाठी बंद असणार आहे.
सदर अंडरपास मुंबई -नाशिक महामार्गाच्या दोन्ही बाजूंना जोडतो.कळवा-मुंब्रा, नवी मुंबई, भिवंडी व कल्याण-डोंबिवली दरम्यान प्रवास करणारे तसेच नाशिक, गुजरात, पनवेल व कोकणाकडे जाणारे प्रवासी या अंडरपासचा वापर करतात. वाहनचालकांना त्यांच्या प्रवासाचे आगाऊ नियोजन करण्याचा तसेच नियुक्त केलेल्या वळवण्याच्या मार्गांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
वाहतुकीबाबतचा सल्ला
मुंबईकडून खारेगावच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना खारेगाव टोलनाका येथून डावीकडे वळावे लागेल व गॅमन पारसिक सर्कलमार्गे पुढे जावे लागेल. नाशिककडून येणाऱ्या वाहनांना साकेट कटमार्गे वळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भिवंडी, ठाणेकडे जाणाऱ्या वाहनांनी खारेगाव पारसिक सर्कल -गॅमन सर्कल-खारेगाव टोलनाका मार्गाचा अवलंब करावा व खारेगाव -कळवा नाकामार्गे पुढे जावे, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले.
पोलीस, अग्निशामक दल व रुग्णवाहिका यासारख्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना सदर निर्बंधातून वगळण्यात आले आहे, असे ठाणे वाहतूक पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अंडरपासचे काम सुरू असेपर्यंत वाहनचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही संबंधित यंत्रणेतर्फे करण्यात आले आहे.