

शशिकांत सावंत
मुंबई-गोवा महामार्ग नेहमीच चर्चेत राहिला आहे. आतापर्यंत 7 वेळा हा महामार्ग पूर्ण करण्याबाबत डेडलाईन दिल्या गेल्या; पण अद्यापही तो अपूर्णच आहे. आता आणखी एक नवीन डेडलाईन मिळाली आहे. गेली 14 वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न खासदार अरविंद सावंत यांनी संसदेत मांडला. आतापर्यंत दिलेल्या 7 डेडलाईन सरकार पाळू शकले नाही आणि आता संसदेत खासदार अरविंद सावंत यांच्या प्रश्नावर बोलताना केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी हा महामार्ग पूर्ण करण्याची शेवटची मुदत एप्रिल 2026 दिली आहे.
म्हणजेच आणखी 5 महिन्यांनी हा महामार्ग पूर्ण होईल, असे यातून स्पष्ट होत असले तरी प्रत्यक्ष अपुरे काम आणि कामाचा वेग पाहता, या मुदतीत तरी काम पूर्ण होणार का, याबाबत प्रश्नचिन्हच आहे. खासदार अरविंद सावंत यांनी चंद्रावर जाण्याचा खर्च कमी आहे; पण मुंबई-गोवा महामार्ग हजारो कोटी रुपये खर्च करूनही अपुरा असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. यामागे ठेकेदारांचा हलगर्जीपणा, जमीन संपादनातील अडचणी, अशी कारणे असल्याचे गडकरी यांनी सांगितले. त्यांनी दिलेले उत्तर काही अंशी खरे असले, तरी क्षमता नसलेले ठेकेदार नेमले गेल्याने ही कामे रखडली, हे अधिक वास्तववादी उत्तर आहे.
सरकारने या महामार्गाचे 89 टक्के काम झाल्याचे सांगितले आहे; परंतु हेही सत्य नाही. आतापर्यंत फक्त 70 टक्केच काम झाले आहे. जे काम पूर्ण झाले आहे, ते पणजी -राजापूरपर्यंत. लांजा बाजारपेठेतील उड्डाणपूल, संगमेश्वर येथील उड्डाणपूल, चिपळूण बाजारपेठेतील उड्डाणपूल, लोणेरे उड्डाणपूल, माणगाव-इंदापूर बायपास, कोलाड नाका येथील उड्डाणपूल, सुकेळी खिंड घाटरस्ता, वाकण ते नागोठणेदरम्यानचा मार्ग ही कामे वर्षानुवर्षे रखडली आहेत.
पहिला टप्पा हा पळस्पे फाटा ते इंदापूर सुरू होऊन 14 वर्षे झाली आहेत; तर इंदापूर ते गोवा या टप्प्याचे काम सुरू होऊन 10 वर्षे झाली. मात्र, या दोन्ही टप्प्यांमध्ये कामे अपुरी आहेत. उड्डाणपूल न होण्यामागे ठेकेदारांचा निष्काळजीपणा हे मुख्य कारण आहे. वर्षानुवर्षे ठेकेदार काम करत नाहीत आणि त्यांना कुणी विचारतही नाही. त्यामुळे या कामांची प्रचंड हेळसांड झाली. 2009 मध्ये काँग्रेस सरकारच्या काळात पळस्पे ते इंदापूर टप्प्याचे काम सुरू झाले.
मात्र, इंदापूर ते गोवा हा टप्पा 2014 मध्ये नितीन गडकरी दळणवळणमंत्री झाल्यानंतरच सुरू झाला. या टप्प्यातच मोठ्या प्रमाणावर उड्डाणपूल रखडलेले आहेत. चिपळूणचा उड्डाणपूल कोसळल्यानंतर त्या उड्डाणपुलाचे कामच ठप्प झाले. ते आजतागायत सुरू झालेले नाही. रखडलेले सात उड्डाणपूल जोपर्यंत होणार नाहीत, तोपर्यंत हा महामार्ग पूर्ण होणे केवळ अवघड आहे. आता संसदेत कोकणचे सुपुत्र अरविंद सावंत यांनी हा मुद्दा लावून धरल्यामुळे या प्रश्नाकडे पुन्हा एकदा देशाचे लक्ष वेधले गेले.
मुंबई आणि कोकण यांचे नाते वर्षानुवर्षांचे आहे. साधारणत:, शंभर वर्षांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गाची आखणी झाली. त्याकाळी ब्रिटिश सरकारने बांधलेले पूल अलीकडच्या काळापर्यंत टिकून होते. या महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय 2007 साली झाला आणि 2009 मध्ये प्रत्यक्ष पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले. पहिला टप्पा 14 वर्षे, तर दुसरा टप्पा जवळपास 10 वर्षे रखडलेला आहे. यामुळे जवळपास 7,500 अपघात होऊन 3 हजारांवर लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. तरीही महामार्गाचे काम अपूर्णच आहे. त्यामुळे कोकणात प्रचंड असंतोष आहे.
अनेक मंत्र्यांचे महामार्गाचे दौरे झाले. त्यामध्ये काँग्रेस सरकारच्या काळात तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्यापासून ते चंद्रकांत पाटील, रवींद्र चव्हाण, त्यानंतर आताचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले अशी नावांची लांबलचक यादी आहे. त्यांनी आतापर्यंत दिलेल्या 7 मुदती कालबाह्य ठरल्या. आता संसदेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शेवटची मुदत एप्रिल 2026 ही दिली आहे. या कालमर्यादेत तरी हा महामार्ग पूर्ण होवो, हीच अपेक्षा.