

eknath shinde mns alliance: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सत्तास्थापनेच्या रस्सीखेचात एक मोठी बातमी समोर येत आहे. शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपला बाजूला ठेवून मनसेच्या साथाने सत्तास्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. खुद्द खासदार श्रीकांत शिंदे यांनी याबाबतची माहिती पत्रकारांना दिली आहे. मनसेचे पाच आणि शिवसेनेचे ४ नगरसेवक हे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मनसेने आधीच पाठिंबा दिला आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेनेने (शिंदे गट) ५३ जागा जिंकल्या आहेत. तर मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांचे मिळून ९ नगरसेवक आहेत. या दोघांची बेरीज ही ६२ पर्यंत पोहचत आहे. दरम्यान, कोकण भवनात खासदार श्रीकांत शिंदे, मनसे नेते राजू पाटील, नरेश म्हस्के यांची बैठक झाली.
दरम्यान, या बैठकीनंतर एकानथ शिंदे यांचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवलीत मनसे शिवसेनेला पाठिंबा देत आहे. आम्ही सर्वजण मिळून सत्ता स्थापन करणार आहोत. ठाकरेंच्या नगरसेवकांनी आम्हाला पाठिंबा दिला तर बरं होईल असं सुचक वक्तव्य देखील श्रीकांत शिंदे यांनी केलं.
श्रीकांत शिंदे प्रतिक्रिया देताना पुढे म्हणाले, 'भाजप आणि आमच्यात कोणतीही चढाओढ नाही. आम्ही मिळून सत्ता स्थापन करत आहोत. लवकरच कुणाचा महापौर आणि कोणाचा उपमहापौर होईल हे स्पष्ट होईल.'
श्रीकांत शिंदे यांनी विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे मनसे नेते राजू पाटील आमचे मित्र आहेत. ते आम्हाला पाठिंबा देत असतील तर त्यात गैर काय असा सवाल देखील शिंदे यांनी विचारला.
दरम्यान, कल्याण डोंबिवलीतील राजकीय उटथापालथीनंतर आता मुंबईतही काही वेगळी खेळी होणार का याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत बोलताना श्रीकांत शिंदे यांनी मुंबईत युतीचाच महापौर बसेल. त्यात शिवसेनेचा महापौर बसला नाही तर कुणाला आवडणाल नाही. असं म्हणत श्रीकांत शिंदे यांनी राजकारणात काहीही घडू शकतं असे संकेत दिले.
आता कल्याण डोंबिवलीत ठोकरेंच्या शिवसेनेचे ४ नगरसेवक काय करणार याच्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्याचबरोबर आता भाजप यावर कशी प्रतिक्रिया देतो हेही पहावं लागणार आहे.