

raj-uddhav thackeray joint rally
मुंबई : "राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत, हे पाहून मुंबईकरांना आणि संपूर्ण महाराष्ट्राला मनापासून आनंद झाला आहे. दोन भाऊ एकत्र येणे ही राज्यासाठी सकारात्मक गोष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची तुम्हाला पूर्ण साथ आहे. येणाऱ्या काळात मुंबईचा महापौर कोण असेल, हे दोन्ही ठाकरे बंधूच ठरवतील," असा विश्वास राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी आज (दि.११) व्यक्त केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व मनसे यांनी ‘शिवतीर्था’वर आयोजित केलेल्या संयुक्त सभा ते बोलत होते.
यावेळी जयंत पाटील यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्यातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, "जेव्हा शिवाजी पार्कवर शिवसेनेची स्थापना झाली, तेव्हा शरद पवारांनी कट्ट्यावर बसून ती सभा ऐकली होती. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचे पक्ष वेगळे असले तरी मराठी माणसाच्या हितासाठी ते नेहमीच एकत्र आले."
"छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सुरत लुटली होती, याचा राग अनेकांच्या मनात आजही आहे," असा टोला त्यांनी लगावला. जेव्हा जेव्हा मुंबईतील भूमिपुत्र अडचणीत असतो, तेव्हा त्याला ठाकरे कुटुंबाचीच आठवण येते, असेही त्यांनी नमूद केले. "राष्ट्रवादी काँग्रेसची तुम्हाला पूर्ण साथ आहे. येणाऱ्या काळात मुंबईचा महापौर कोण असेल, हे दोन्ही ठाकरे बंधूच ठरवतील," असे त्यांनी स्पष्ट केले.