

Kalyan Dombivali municipal corporation Open Manhole Death Case
मुंबई : कल्याण डोंबिवली पालिकेच्या नाकर्तेपणामुळे मॅनहोलमध्ये पडून एका लहान मुलाचा झालेल्या मृत्यू प्रकरणी हायकोर्टाने गंभीर दखल घेतल्यानंतर या मृत्यूची जबाबदारी स्वीकारत मुलाच्या पालकांना 6 लाखांची नुकसान भरपाई देण्याचे अखेर केडीएमसीने अखेर मान्य केले. 13 वर्षीय आयुष कदमचे वडील एकनाथ कदम यांना पुढील दोन आठवड्यांत ही रक्कम दिली जाईल अशी माहिती न्यायालयाला दिली.
न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठाने याची नोंद घेत ठाण्यातील घोडबंदर रोडवरील भयावह परिस्थिती आणि या वर्षभरात ठाण्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झालेल्या 18 मृत्यूंच्या वृत्ताचीही दखल घेत ठाणे महापालिका आणि राज्य सरकारला 15 डिसेंबरला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिलेत.
मॅनहोल्सच्या प्रश्नावर विविध निर्देश दिले होते. त्याला अनुसरून रस्त्यांची देखभाल करण्यात पालिका अपयशी ठरल्या, असा दावा करीत ॲड. रुजू ठक्कर यांनी अवमान याचिका दाखल केली होती. ही याचिका खंडपीठाने निकाली काढली. मात्र मुसळधार पावसात डोंबिवलीतील उघड्या नाल्यात वाहून गेलेल्या 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याने उघड्या मॅनहोल्सचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
मागील सुनावणीच्या वेळी खंडपीठाने मुलाच्या नातेवाईकांना भरपाई देणार की नाही, अशी थेट विचारणा करत कल्याण डोंबिवली पालिकेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. आजच्या सुनावणीच्या वेळी पालिकेने मुलाच्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारताना त्यांच्या पालकांना 6 लाखांची नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले.