

मुंबई ः महानगरपालिकेचे अधिकारी असल्याची बतावणी करुन परिसरातील व्यापाऱ्यासह व्यावसायिकांवर कारवाईची धमकी देऊन खंडणी उकाळण्याचा प्रयत्न स्थानिक रहिवाशांनी हाणून पाडला. याप्रकरणी दोन महिलांसह चौघांविरुद्ध धारावी पोलिसांनी तोतयागिरी करुन खंडणीची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
हनुमंत नागप्पा कुचीकुर्वे या आरोपीस पोलिसांनी अटक केली असून त्याच्या चौकशीतून इतर तिघांचे नाव समोर आले. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. धारावीतील राजीव गांधी नगर परिसरात आबिद बिग्ना शेख यांचा बॅग बनविण्याचे एक युनिट आहे. याच युनिटमध्ये दिपाली दिपक दळवी आणि मेघा सोनावणे नावाच्या दोन महिला आल्या. त्यांनी मनपा अधिकारी असल्याची बतावणी करुन त्यांच्या बॅग बनविण्याच्या युनिटमध्ये बालकामगार काम करत असल्याचा आरोप केला.
त्यांच्यावर कारवाईची धमकी देऊन या महिलांनी त्यांच्याकडे 25 हजाराची मागणी केली होती. कारवाईच्या भीतीने त्यांनी त्यांना पैसे देऊन प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर या दोन्ही महिलांसह इतर दोनजण तिथे आले. त्यांनी त्यांच्याकडे एका बॅगेची मागणी केली, मात्र त्यांनी बॅग देण्यास नकार देताच त्यांनी त्यांना पुन्हा कारवाईची धमकी दिली.
ही टोळी महापालिकेचे अधिकारी असल्याची बतावणी करुन कारवाईची धमकी देऊन खंडणी उकाळण्याचे काम करत होती. या टोळीने आतापर्यंत किती लोकांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळले आहे याची माहिती घेतली जात आहे.
वारंवार कारवाईची धमकी मिळत असल्याने त्यांनी शहानिशा सुरु केली होती. तपासात त्यांनी इतर व्यापारी आणि व्यावसायिकांनाही अशाच प्रकारे धमकावून पैसे उकळल्याचे उघड झाले. त्यांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने तिथे फिरत असलेल्या हनुमंत कुचीकुर्वे याला ताब्यात घेतले मात्र इतर तीनजण पळून गेले. त्याला धारावी पोलिसांच्या स्वाधीन करुन त्यांनी घडलेला प्रकार सांगितला.