

सापाड (ठाणे): कल्याण शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडी हा दिनक्रम बनला असून नागरिक, कामगार, शाळा-कॉलेज विद्यार्थी तसेच आपत्कालीन सेवांमध्ये धावणाऱ्या रुग्णवाहिका चालकही मोठ्या अडचणीत सापडले आहेत. शहरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी असतानाही दिवसा मुख्य रस्त्यांवरून जाणाऱ्या ट्रक, ट्रेलर, कंटेनरसारख्या मोठ्या वाहनांमुळे वाहनचालक अक्षरशः त्रस्त झाले असून परिणामी शिवाजी चौक, सहदानंद चौक, लाल चौक, स्टेशन रोड तसेच अंतर्गत रस्तेही दिवसभर जाम झालेले दिसून येत आहेत.
महापालिका व वाहतूक विभागाने काही वर्षांपूर्वी शहरातील अवजड वाहनांच्या प्रवेशावर वेळेची मर्यादा व निर्बंध लावले होते. शहरातील दाट लोकवस्ती, अरुंद रस्ते आणि वाढता वाहनांचा ताफा पाहता हा निर्णय आवश्यक होता. मात्र प्रत्यक्षात या आदेशांची जमिनीवर अंमलबजावणी फारशी होताना दिसत नाही. दिवसा सामान्य वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अवजड वाहनांना शहराबाहेरून गोविंदवाडी बायपास मागनि पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. मात्र गोविंदवाडी बायपासच दिवसभर वाहतूककोंडीत अडकल्यामुळे अवजड वाहनांनी शहराच्या मुख्य रस्त्यावरून आपले वाहन जाण्यास सुरुवात केली. परिणामी मोठमोठे ट्रक, कंटेनर हेच रस्त्यांवरून जाताना दिसत होते. यामुळे शहरातील रस्त्यावर वाहनाच्या प्रचंड रांग लागून वाहतूककोंडी निर्माण झाली होती.
शहरातील नागरिक, स्वयंसेवी संस्था, व्यापारी संघटना यांनी वाहतूक पोलिसांचे लक्ष वारंवार वेधूनही परिस्थिती जशीच्या तशी आहे. वाहतूक कोंडीमुळे नागरिकांनी वाहतूक पोलीस प्रशासनाने नाराजी व्यक्त केली आहे. काही नागरिकांनी तर स्पष्टपणे म्हटले आहे की, अवजड वाहनांवर बंदी असताना दिवसा ही वाहने शहरात कशी येतात? हे का थांबवले जात नाही?, या प्रश्नांची उत्तरे आजही गुलदस्त्यातच आहेत. दररोज कोंडीत तासन्तास अडकणाऱ्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. परिणामी कामावर जाण्यासाठी कामावरून घरी येण्यासाठी उशीर होतो. मुलांना शाळेत सोडताना त्रास सहन करावा लागतो. बस व रिक्षांचे वेळापत्रक विस्कळीत होते. वाहतूक कोंडीत अडकून पेट्रोलचा अधिक वापर होतो, तर ध्वनी आणि वायू प्रदूषणात वाढ होत असल्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या वाहतूककोंडीचा शहराच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत आहे.
वाहतूककोंडी तत्काळ सोडविण्याची गरज
कल्याणसारख्या वाढत्या शहरीकरण असलेल्या शहरात वाहतूक व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. अवजड वाहनांवर नियंत्रण, रस्त्यांचे रुंदीकरण, पार्किंग धोरण सुधारणा, पथविक्री नियमन, सिग्नल व्यवस्था दुरुस्ती आणि अधिक मनुष्यबळ नेमणूक या उपाययोजना तातडीने अमलात आणल्याशिवाय परिस्थिती सुधारण्याची शक्यता कमी आहे. कल्याण शहरातील वाहतूक कोंडी आता 'नेहमीची' समस्या न राहता 'तत्काळ' सोडवण्याची गरज असलेली गंभीर समस्या बनली आहे. शहरवासीयांची दमछाक, वेळेचा अपव्यय, वाढते प्रदूषण थांबवायचे असेल तर प्रशासनाने नियोजनबद्ध पावले उचलणे अत्यावश्यक आहे.