

ठाणे : दिलीप शिंदे
आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या निमहान्स बंगळुरू मनोरुग्णालयाच्या धर्तीवर ठाण्यात 560 कोटी खर्चून अद्ययावत अशा ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाची उभारणी होत आहे. ब्रिटिशकालीन 1901 वर्षांपूर्वीच्या जुन्या इमारती तोडून तब्बल 3 हजार 287 बेडची क्षमता असलेल्या नव्या रुग्णालयाची निर्मिती होत आहे.
निमहान्स बंगळुरूच्या धर्तीवर ठाणे मनोरुग्णालय उभारले जात असून महिनाभरात बांधकामांना सुरुवात होईल. 560 कोटी खर्चून उभारले जाणार्या 3 हजार 278 बेड क्षमतेच्या रुग्णालयात अत्याधुनिक सुविधांसह न्यूरॉलॉजी विभाग सुरु केला जात आहे. नातेवाइकांना बर्या झालेल्या रुग्णाबाबत आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी रिलेटिव्ह हॉस्टेलची सुविधा दिली जाणार असल्याचे ठाणे मध्यवर्ती मनोरुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. नेताजी मुळीक यांनी सांगितले.
धोकादायक बनलेल्या ब्रिटिशकालीन इमारती आणि ठाणेकरांची नवीन रेल्वे स्थानक आणि रिंग रूट मेट्रोची गरज लक्षात घेता आरोग्य विभागाने ठाणे महापालिकेला जागा देण्याचा निर्णय घेतला. तब्बल 15 एकर जागा पालिकेला दिल्याने रुग्णालयाच्या पुनर्बांधणीचा विकास आराखडा वारंवार बदलून अंतिम करण्यात आला. त्यानुसार 560 कोटी खर्च करून अद्ययावत मनोरुग्णालय उभारले जात आहे.
नामदार एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचा सुधारित प्रस्ताव मंजूर झाला आणि 13 जानेवारी 2025 रोजी ठेकेदाराला कामाचा कार्यादेश दिला. आतापर्यंत 22 जुन्या इमारती तोडण्यात आल्या आहेत. पर्यावरण विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र आणि ठाणे महापालिकेची बांधकाम परवानगी मिळताच रुग्णालयाच्या बांधकामाचे भूमिपूजन होईल, असे समजते.